Thursday, October 30, 2025
Happy Diwali

बियाण्यांसाठीच्या टोकन वाटपात गोंधळ

बियाण्यांसाठीच्या टोकन वाटपात गोंधळ

वाडा (वार्ताहर) : वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी भातबियाणे सवलतीत वाटप करण्यात आले. मात्र या वाटपावेळी कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना अनेक तास उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. वाडा पंचायत समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी भातबियाणे वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर करून बियाणे वाटपावेळी गर्दी टाळण्यासाठी अगोदर टोकन देण्याचे नियोजन केले होते.

जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे गुरुवारी प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांची नाव नोंदणी करून टोकन देण्यात आले. हे टोकन दाखवून बियाणे मिळणार होते. टोकन देण्यासाठी सकाळीच तीन टेबल लावून रांग लावणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता एकच टेबल लावल्याने लाभार्थ्यांची गर्दी झाली.

शेवटी गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आले. पाच वाजेपर्यंत पंधराशेच्या वर शेतकऱ्यांना टोकन वाटप केले असून शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना आज शुक्रवारी कार्यालयातून टोकन मिळणार आहे, असे कृषी अधिकारी बी. बी. शिंदे यांनी सांगितले.

सकाळी सात वाजता येऊन रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांना बारा वाजेपर्यंत टोकन मिळाले नाही, तर अर्धा तास आधी आलेला शेतकरी टोकन घेऊन गेला. मी स्वतः चार तास रांगेत उभा होतो, तेव्हा टोकन मिळाले. - सुनील पाटील, शेतकरी

Comments
Add Comment