मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला. ही अपेक्षा त्यांच्याकडून नव्हती. मी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी ऑफर त्यांनी मला दिली. परंतु मी त्यास नकार दिला. शिवसेना पुरस्कृत नव्हे तर महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून मला पाठिंबा द्यावा अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली. सगळं काही ठरलं. त्यांचे खासदार, मंत्र्यांशी चर्चा केली. पण कोल्हापूरला जाताना वेगळ्याच बातम्या समोर आल्या, असा खुलासा छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.
कोणापुढे झुकून खासदारकी घेणार नाही; संभाजीराजेंची ‘स्वाभिमाना’ने माघार
शिवसेनेने दिलेली ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे यांनी आपण खासदारकीच्या निवडणुकीला सामोरे जाणार नसल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे मंत्री, नेत्यांबद्दल खुलासे केले. सुरुवातीलाच संभाजीराजेंनी महाराष्ट्रातल्या जनतेचेही आभार मानले.
राज्यसभा निवडणुकीबद्दलची भूमिका स्पष्ट करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मी जे बोलणार आहे ते बोलायची माझी इच्छा नाही, माझ्या रक्तात, तत्वात ते नाही. पण मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, आपण कोणतंही शिवाजी महाराजांचं स्मारक, पुतळा असेल तिथे दोघांनी जायचं, दोघांनी स्मरण करायचं आणि संभाजी खोटं बोलत असेल तर सांगायचं. मुंबईत आल्यावर दोन खासदार मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठवले, आमची बैठक झाली, दोघांनीही सांगितलं की शिवसेनेत प्रवेश करा आम्ही उमेदवारी जाहीर करतो. मी स्पष्ट सांगितलं मी प्रवेश करणार नाही.
पुढे संभाजीराजे म्हणाले,” त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी मला फोन करत निमंत्रित केलं आपण वर्षावर या चर्चा करू.मीही मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर भेटायला गेलो. तिथे तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. तिथे त्यांनी पहिला मुद्दा मांडला की आम्हाला छत्रपती सोबत हवे आहेत. म्हणून आम्ही पहिला प्रस्ताव सोबत ठेवतो की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा. पण या मुद्द्याला मी नकार दिला. मग मी म्हणालो की शिवसेनेची सीट आहे असं ते म्हणतात, त्यांच्याकडे कोटा नाहीये तरीही ते असं म्हणतायत, मग मी प्रस्ताव ठेवला की मला महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार घोषित करा.
“तर त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ते शक्य नाही पण मविआच्या वतीने शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आम्ही तुम्हाला करायला तयार आहे. तरी मी मान्य केलं नाही. म्हटलं दोघे दोन दिवस विचार करू, पुन्हा भेटू. दोन दिवसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचा फोन आला की आम्हाला उमेदवारी द्यायची आहे. त्यानंतर उमेदवारीचा ड्राफ्ट तयार झाला… मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि मी दिलेल्या सूचना या दोन्हीचा विचार करून मधला मार्ग काढला. आजही माझ्याकडे तो ड्राफ्ट आहे, मंत्र्यांचं हस्तलिखित, त्यांच्याकडचे सगळे मेसेज माझ्याकडे आहेत”.
संभाजीराजेंनी त्या दिवशीचा सगळा घटनाक्रम सांगितला. राजे पुढे म्हणाले, “सगळं शिष्टमंडळ आलं, एक स्नेही होते, खासदार होते. त्या स्नेह्यांनी मला सांगितलं की आजही मुख्यमंत्र्यांना वाटतं की शिवसेनेत या, मी म्हटलं तसं असेल तर मला पुढं जायचंच नाही. तेव्हा मंत्र्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा ड्राफ्ट वाचू. त्यात एक शब्द होता. तो जो शब्द होता, जो बदलला, मला तो सांगायचा नाही. त्यानंतर ड्राफ्टही फायनल झाला, मग मी कोल्हापूरला गेलो, पोचल्यावर मला बातमी कळली की संजय पवार जो माझाच कार्यकर्ता आहे, त्याला उमेदवारी मिळाली आहे. मी मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना फोन केला, कोणी काहीच बोललं नाही. मुख्यमंत्र्यांनी माझा शब्द मोडला, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण मी आता स्वराज्य बांधण्यासाठी सज्ज झालोय. मी मोकळा झालो आहे विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी.”
मी छत्रपती आहे, मी माझं काम पाहून मला पाठिंबा द्या अशी विनंती करत होतो. पण मी कोणापुढे झुकून, कोणापुढे वाकून खासदारकी घेणार नाही. ही माझी माघार नाही, हा माझा स्वाभिमान आहे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले आणि आपण राज्यसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. या निवडणुकीत घोडेबाजाराची शक्यता आहे. तो होऊ नये यासाठी आपण ही निवडणूक लढवत नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
छत्रपती संभाजीराजे पुढे म्हणाले की, माझी उमेदवारी ही घोडेबाजारासाठी नव्हती. सगळ्या पक्षातील लोकांनी मला मदत करावी. निष्कलंक माझं व्यक्तिमत्व आहे. घोडेबाजार होऊ नये म्हणून मी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. ही माघार नाही तर माझा स्वाभिमान आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याने मी मोकळा झालो आहे. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. माझ्यासाठी खासदारकी महत्त्वाची नाही. माझ्यासाठी जनता महत्त्वाची आहे. स्वाभिमानाने आणि सन्मानाने राहणारं माझं व्यक्तिमत्व आहे. मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य संघटना पुढे कार्यरत ठेवणार आहे. स्वराज्य संघटना मजबूत करणार आहे. राज्यभरात दौरे करून सघटनेला उभारी देणार आहे. मला माझी ताकद ४२ आमदार नाही तर जनता आहे, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
अटी ठेवल्या, निरोप धाडला, शिवबंधन बांधा
शिवसेनेत या, शिवबंधन बांधा तरच राज्यसभेची उमेदवारी देऊ अशी अट उद्धव ठाकरेंनी संभाजीराजे छत्रपतींसमोर ठेवली. इतकंच नाही तर राज्यसभा हवी असेल तर मातोश्रीवर येऊन शिवबंधन बांधा, असा निरोप शिवसेनेने राजेंना धाडला. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती इच्छुक होते. अपक्ष म्हणून लढण्यावरच त्यांचा सुरुवातीपासून भर होता. त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, शरद पवारांना राजे भेटले, अगदी फडणवीसांचीही त्यांनी भेट घेतली. अपक्ष म्हणून लढलो तर सर्वपक्षीय पाठिंबा देतील अशी अपेक्षा राजेंना होती पण तसं झालं नाही. तरीही संभाजीराजे म्हणतात, मी अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लढवणार होतो. मला कुठल्याही पक्षाचा द्वेष नाही.