Friday, May 9, 2025

महाराष्ट्र

औरंगाबाद : सदनिकांच्या विक्रीसाठी २४ जूनला सोडत

औरंगाबाद : सदनिकांच्या विक्रीसाठी २४ जूनला सोडत

मुंबई (प्रतिनिधी) : औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील विविध गृहप्रकल्पांतर्गत ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्रीकरिता सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत आता २४ जून, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृह येथे काढण्यात येणार आहे.


औरंगाबाद मंडळातर्फे सोडतीबाबत जाहीर सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी १० जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत करता येणार असून नोंदणीकृत अर्जदारांना ११ जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. अनामत रकमेच्या ऑनलाइन स्विकृतीकरिता १२ जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत असून बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा १३ जून रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे.


सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक २२ जून रोजी दुपारी १.०० वाजता म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर केली जाणार आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ 'गो-लाइव्ह' कार्यक्रमांतर्गत २६ एप्रिल, २०२२ पासून झाला आहे.


प्रधानमंत्री आवास योजना (नागरी)


औरंगाबाद मंडळाच्या सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३३८ सदनिका आहेत. यामध्ये लातूर एमआयडीसी येथे ३१४ सदनिका, सिरसवाडी रोड, जालना येथे १८ सदनिका, औरंगाबाद येथील नक्षत्रवाडी येथे ६ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.


२० टक्के सर्वसमावेशक योजना


२० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी काळे इस्टेट, इटखेडा, ता. जि. औरंगाबाद येथे ३१ सदनिका, तर देवळाई (जि. औरंगाबाद) येथे २३ सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. औरंगाबाद मंडळाच्या सोडतीत सहभाग घेणाऱ्या इच्छूक अर्जदारांकरिता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर सोडतीबाबत मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. सर्व इच्छूक अर्जदारांनी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.


म्हाडा गृहनिर्माण योजना


म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी भोकरदन (जि. जालना) येथे २७ भूखंड व २ सदनिका, अंबड (जि. जालना) येथे ६ सदनिका, सिरसवाडी रोड, जालना येथे ३८ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी सोडतीत भोकरदन (जि. जालना) येथे ९ भूखंड, हिंगोली येथे १६ सदनिका, टोकवाडी (ता. मंठा, जि. जालना) येथे ५३ भूखंड, औरंगाबाद येथील गृहनिर्माण भवनाजवळ ४ सदनिका, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे २ सदनिका, नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे १९ भूखंड सोडतीत उपलब्ध आहेत. सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी भोकरदन (जि. जालना) येथे ९ भूखंड, कन्नड (जि. औरंगाबाद) येथे ६ सदनिका, हिंगोली येथे ३५ सदनिका, परभणीतील गंगाखेड रोड येथे २५ सदनिका व ३४ भूखंड, उस्मानाबाद एमआयडीसी एरिया येथे ५ सदनिका, चिखलठाणा (औरंगाबाद) येथे ३९० सदनिका, सेलू (जि. परभणी) येथे २ भूखंड, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे १ गाळा, नवीन कौठा (जि. नांदेड) येथे १ सदनिका, नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे ५९ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Comments
Add Comment