सफाळे (वार्ताहर) : पालघर तालुक्यातील केळवा रोड स्थानकाच्या पूर्व-पश्चिम भागातील आदिवासी व सरकारी जागेवर बेकायदेशीर उभारलेल्या चाळी गेल्या आठवड्यात जमीनदोस्त करण्याच्या कामास सुरुवात केली होती.
त्या स्थगित मोहिमेला मंगळवारी पुन्हा सुरुवात करून तहसीलदार सुनील शिंदे यांनी पाचशेच्यावर खोल्या जमीनदोस्त केल्या. या धडक मोहिमेमुळे चाळमाफियांचे धाबे दणाणले आहेत. एकंदर तीन हजार अनधिकृत खोल्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
केळवा रोड स्थानकावरून मुंबईहून येणे व गुजरातकडे ये-जा करणे सहज शक्य होते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांनी चाळी उभारल्या. या बेकायदेशीर चाळी या आदिवासी व सरकारी जमीनवर असल्याने महसूल विभागाचे दुर्लक्ष होते. त्यामुळे स्थानिकांना हाताशी धरून सुमारे तीन हजारांच्यावर खोल्या बांधण्यात आल्या.
अखेर महसूल विभागाने गेल्या बुधवारी देविपाडा येथील तीनशेच्यावर खोल्या तोडल्या त्यानंतर मंगळवारी पुन्हा देवीपाडा, भुताळमान येथील ७५० खोल्या जमीनदोस्त केल्या आहेत.
तक्रारींची घेतली दखल
आदिवासी नागरिकांच्या जमिनीची विक्री होत नसल्याने स्टॅम्प पेपर अथवा साठे कराराच्या माध्यमातून विक्री करार करून आदिवासी बांधवांकडून कवडीमोल भावात जमिनी खरेदी केल्या जात आहेत. हा व्यवहार बेकायदेशीर करताना अशिक्षितपणामुळे खरेदीचा व्यवहार सुरू करण्याच्या तक्रारी येत होत्या.
त्या आनुषंगाने अनधिकृत चाळींवर कारवाई करावी, यासाठी अहवाल पाठवला होता. यावेळी सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, हेडकॉन्स्टेबल महेंद्र शर्मा व मोरे, शेळके, सातपुते यांच्यासह मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.