Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीबदल घडवणारा जिद्दी माणूस

बदल घडवणारा जिद्दी माणूस

डॉ. उदय निरगुडकर

नितीनजी गडकरी हे दुर्दम्य आशावादी आहेत. कधीही निराश न होणारे आशावादी! त्यांच्याशी होणारी प्रत्येक भेट म्हणजे सकारात्मक ऊर्जेनं भारून जाणं. त्यांच्या कार्यसाधनेत संसाधनांची कमतरता कधीच अडथळा ठरत नाही. हा सतत लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. त्यांनी समाजाला आणि देशाला पुष्कळ काही दिलं आहे. परमेश्वर त्यांना भारत घडवण्याची शक्ती प्रदान करो, याच शुभेच्छा!

केवळ विचार नव्हे तर त्या विचारांची कृतीही समाज परिवर्तनासाठी महत्त्वाची असते… अगदी विचारापेक्षादेखील! नितीन गडकरी यांचं एका वाक्यात वर्णन करायला गेलो तर ही ओळ अगदी चपखल आहे. किंबहुना, अनेक समकालीन राजकारण्यांपासून परिवर्तनाच्या ध्यासाने सतत कार्यरत असणं त्यांना वेगळं ठरवत असतं. त्यांच्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये कोणताही फरक नसतो. म्हणूनच आजच्या संधीसाधू आणि प्रसिद्धीलोलूप राजकारणात नितीन गडकरी ही नाममुद्रा एखाद्या तडपत्या ब्रँडसारखी भासते.

१९ डिसेंबर २००९ या दिवशी नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. इतकी मोठी जबाबदारी मिळाल्याचं त्यांना आश्चर्य वाटलंच. पण राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातही अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याच वेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं. कारण भिंतींवर पोस्टर चिकटवणारा एक सामान्य कार्यकर्तादेखील पक्षाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो. याआधी नितीनजींनी संघटनेत अनेक महत्त्वाची पदं भूषवली होती. गरजू व्यक्तींना मदत करणं, वंचितांसाठी धावून जाणं हा त्यांच्यासाठी कुटुंबसंस्काराचा एक भाग आहे. आईच्या अत्यंत शिस्तबद्ध संस्कारांचा त्यांच्यावर सखोल परिणाम झाला. लहानपणी मिळालेलं हे संस्कारमूल्य हाच आजच्या नितीन गडकरी या ब्रँडच्या यशाचा गाभा आहे. कोणीही जावं आणि गडकरींनी त्याला मदत करावी, ही आता वेगळी ओळख बनली आहे. गरिबी अत्यंत जवळून पाहिल्यामुळे ते पैशाची योग्य किंमत ओळखून आहेत. म्हणूनच दारिद्र्यरेषेखालील व्यक्तीला समृद्ध करण्यासाठी झटणं हा त्यांचा ध्यास झाला. अशी वर्षानुवर्षं, दशकानुदशकं मदत करत राहण्याचा त्यांना कधीही कंटाळा येत नाही, कारण ते याकडे काम म्हणून कधी पाहातच नाहीत. सगळ्यांना मदत करणं हा त्यांच्या जीवनप्रवासाचा भाग बनला आहे. दुसऱ्याला मदत करणं त्यांना मनापासून आवडतं. कधी कधी असं वाटतं की, उद्या त्यांना कोणी मदत करण्यापासून रोखलं तर त्यांना सर्वाधिक दु:ख होईल. नितीन गडकरी असणं म्हणजेच सातत्यानं मदत करत राहणं, समस्या सोडवत राहणं असं हे अविभाज्य समिकरण आहे.

नितीनजींना यशाचं एक एक शिखर पादाक्रांत करताना पाहणारे एक गोष्ट ठामपणे सांगतात की, या सगळ्या काळात बदलली नसलेली एकच गोष्ट म्हणजे नितीनजींचा स्वभाव! यशाच्या शिखरावर पोहोचूनही त्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले आहेत. त्यांना वस्तुस्थितीची, परिस्थितीची नेमकी जाण आहे. पदं आली आणि गेली, सत्ता आली आणि गेली पण नितीनजींनी आपलं कार्यकर्तेपण जीवापाड जपलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ संस्कार यांच्या प्रभावामुळे नितीनजी एक परिपूर्ण स्वयंसेवक आहेत.त्यांच्या आचरणातून आणि विचारांमधून संघविचार प्रखरपणे प्रकट होत असतो. पक्ष संकटात होता, सत्तेत नव्हता त्यावेळीदेखील त्यांची संघविचारांवरील निष्ठा अविचल राहिली. म्हणूनच सत्ता गेल्यावर काँग्रेस पक्ष सोडून पळणाऱ्या विरोधकांनादेखील वडिलकीच्या नात्यानं ‘धीर धरा’ असं सुनावण्याचं वैचारिक उदारपण आणि वडिलकीचा अधिकार त्यांनी निश्चितच मिळवला आहे.

२१व्या शतकाची किती वर्षं सरली आहेत, असा विचार इतर राजकारणी करतात, तर २२व्या शतकासाठी फक्त एवढीच वर्षं उरली आहेत… या दृष्टिकोनातून नितीनजी वर्तमानाकडे पाहतात. यामुळेच इलेक्ट्रिक स्कुटर आणि मोटारगाड्या, वाहनांमध्ये इंधन म्हणून इथेनॉलचा पर्यावरणस्नेही वापर अथवा पायाभूत सोयी-सुविधांच्या माध्यमातून आधुनिक भारताची पायाभरणी, नितीनजी देश आणि त्याचं भविष्य घडवताना दिसतात. देशाच्या प्राथमिकता आणि देशाच्या पायथ्यापासून शिखरापर्यंतची रचना या बाबतीत त्यांच्या कल्पना स्पष्ट आहेत. विकासाची प्राथमिकता ठरवताना रांगेतल्या शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून काम करण्याची संवेदनशीलता त्यांच्याकडे आहे. आजच्या राजकारणात पारदर्शकता आणि सचोटी हे दुर्मीळ गुण आहेत. इतके मोठे प्रकल्प राबवूनदेखील विरोधक त्यांच्या सचोटीबद्दल आणि चारित्र्याबद्दल एकही आरोप करू शकले नाहीत. किंबहुना, त्यांच्या निर्णयक्षमतेची स्तुतीच करतात. यातच त्यांचं मोठेपण सामावलं आहे. लक्षात घ्या, त्यांच्या खात्यातून दररोज अक्षरश: हजारो कोटींची कंत्राटे दिली जातात. नितीनजींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक उद्यमशीलता… या संकल्पनेवर त्यांचा विश्वास आहेच पण त्यानुसार त्यांनी अनेक प्रकल्प राबवले आहेत. कृषी अथवा कारखानदारीत त्यांनी सामाजिक बाबींना कायमच प्राधान्य दिलं. ते स्वत:चं वर्णन ‘सामाजिक उद्योजक’ असं करतात आणि या उद्यमशीलतेचा राष्ट्रनिर्मितीसाठी कसा उपयोग होऊ शकतो याची एक ‘गडकरी थेअरी’ सातत्यानं मांडतात. राजकारणाचं वर्णन ते सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचं माध्यम म्हणून करतात. त्यांच्या प्राथमिकता सुस्पष्ट आहेत. ‘देश सर्वतोपरी, मग पक्ष आणि त्यानंतर व्यक्ती’ या सूत्राचा उल्लेख त्यांच्या अनेक भाषणांमधून वारंवार झालेला आढळतो.

त्यांनी समाजाला आणि देशाला पुष्कळ काही दिलं आहे. परमेश्वर त्यांना २२व्या शतकातला भारत घडवण्याची शक्ती प्रदान करो, याच शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -