Friday, March 21, 2025
Homeदेशदेहविक्री हा व्यवसाय, गुन्हा नाही : सुप्रीम कोर्ट

देहविक्री हा व्यवसाय, गुन्हा नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलीस दलांना देहविक्री करणाऱ्यांसोबत आणि त्यांच्या मुलांशी आदराने वागण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार करू नये असे निर्देशही देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती एल नागेश्वर राव, न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने यासंदर्भातील निर्देश जारी केले. जे अधिकारी इमॉर्टल ट्रॅफिकिंग (प्रिव्हेन्शन) अॅक्ट १९५६ अंतर्गत आपलं कर्तव्य बजावतात त्यांनी देशातील सर्वच व्यक्तींना संविधानाचे संरक्षण मिळाले आहे हे लक्षात ठेवावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या कोणत्याही देहविक्री करणाऱ्या महिलेला कायद्यानुसार तत्काळ वैद्यकीय मदतीसह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे खंडपीठानं सांगितले. जर देहविक्री करणारी व्यक्ती वयस्क आहे आणि आपल्या मर्जीने ती काम करत आहे हे स्पष्ट झाले तर पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करू नये किंवा कोणतीही फौजदारी करावाई करू नये. संविधानाच्या कलम २१ नुसार प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. शिवाय देहविक्री करणाऱ्यांना अटक किंवा त्रास दिला जाऊ नये. आपल्या इच्छेने यात सामील होणे हे अवैध नाही. केवळ वेश्यालय चालवणे अवैध असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

देहविक्री करणाऱ्यांबद्दल पोलिसांचा दृष्टिकोन अनेकदा क्रूर आणि हिंसक असतो, असे दिसून आले आहे. त्यांच्या अधिकारांना मान्यता नाही असे दिसून येते. ज्यांना सर्व मूलभूत मानवी हक्क आणि घटनेनुसार दिलेले अधिकार आहेत त्यांच्याबद्दल पोलीस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अन्य संस्थांनी संवेदनशील राहायला हवे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

पोलिसांनी देहविक्री करणाऱ्या कोणाहीसोबत सन्मानाने वागले पाहिजे आणि त्यांच्यासोबत गैरव्यवहार करू नये. याशिवाय त्यांच्यासोबतची वागणूक हिंसक असू नये किंवा त्यांना कोणत्याही शारीरिक क्रियांसाठी भाग पाडू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. भारतीय प्रेस कौन्सिलने माध्यमांना योग्य मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आवाहन केले पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले. देहविक्री करणाऱ्यांची ओळख, मग ते पीडित असो किंवा आरोपी, अटक, छापे, बचाव कार्यादरम्यान त्यांची ओळख पटेल अशा कोणत्याही फोटोचा वापर न करण्यास न्यायालयाने सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना शेल्टर होम्सचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून त्यांच्या इच्छेविरुद्ध ताब्यात घेतलेल्या प्रौढ महिलांचे पुनरावलोकन केले जाईल आणि त्यांच्या सुटकेसाठी कालबद्ध पद्धतीने कारवाई करता येईल. देहविक्री करणारे यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी वापरत असलेल्या गोष्टींना गुन्हेगारी सामग्री म्हणून ग्राह्य धरले जाऊ नये किंवा त्यांना पुरावा म्हणून सादर करू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश देहविक्री करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसनासाठी तयार केलेल्या पॅनलच्या शिफारसींवर दिले. कोरोना महासाथीदरम्यान देहविक्री करणाऱ्यांना आलेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली.

यावेळी न्यायालयाने सरकार आणि लीगल सर्व्हिस अथॉरिटीला त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत माहिती मिळण्यासाठी आणि कायद्यांतर्गत कशाला परवानगी आहे, कशाला नाही, याची माहिती देण्यासाठी वर्कशॉपचे आयोजनही करण्यास सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -