- रोठे रेल्वे फाटक – कपासे ओव्हर ब्रीज रस्त्याचे काम पाडले बंद
- रस्त्यामुळे पावसाचे पाणी शेती, घरात शिरण्याची भीती
सफाळे (वार्ताहर) : पालघर तालुक्यातील माकूणसार ग्रामपंचायत हद्दीतील पूर्वेकडील करसोंडा येथील रोठे रेल्वे फाटक ते कपासे ओव्हर ब्रीज रेल्वेलगत डीएफसीसीच्या कामामुळे दोन किमी रस्ता तयार करण्यात येत आहे. मात्र या रस्त्यामुळे शेती व घरे पावसाळ्यात पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने बहुसंख्य शेतकरी, ग्रामस्थांनी या रस्ता बांधणीला विरोध दर्शविला असून नुकतेच रस्त्याचे काम बंद पाडले.
पश्चिम रेल्वे डेडिकेटेड फ्रँट कॅरिडॉर प्रकल्पाचे (डीएफसीसी) काम सुरू केले. मात्र या कामांमुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. या प्रकल्पामुळे केळवे पूर्वेकडील करसोंडा भागातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिक आक्रमक झाले, तर दुसरीकडे रोठे रेल्वे फाटक ते कपासे ओव्हर ब्रीज हा रस्ता आदिवासी शेतकऱ्यांनी बंद पाडला असून, कपासे, डोंगरपाडा ते करसोंडा असा रस्ता तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.
कपासे ते करसोंडा हा रस्ता जनतेसाठी उपयुक्त असून शिक्षण घेणारे विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांसाठी सोयीचा आहे. भविष्यात विकासात्मक दृष्टीने मागणी केलेला रस्ता फायदेशीर ठरू शकणार आहे. स्थानिकांचे हित साधणारा तसेच अत्यावश्यकवेळी एखाद्या रुग्णास दवाखान्यात नेण्यास हा रस्ता मुख्य रस्त्याला जोडल्यास मदत होणार आहे. कपासे, डोंगरपाडा हा रस्ता झाल्यास दोन्ही आदिवासी पाडे जोडले जाणार आहेत. सदर रस्ता झाल्यास रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतीचा विकास होणार आहे तसेच शेतीतील शेतीमालाला बाजारपेठ निर्माण करण्यासाठी उपयोग होणार आहे. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी करसोंडा, कपासे व डोंगरपाडा हा रस्ता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
त्यामुळे रोठे रेल्वे फाटक ते कपासे ओव्हर ब्रीज रेल्वेलगत होणारा रस्ता हा आदिवासी बांधवांना धोकादायक ठरू शकणार असल्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांनी सदर रस्त्याला बांधण्यास विरोध दर्शविला आहे. त्याप्रमाणे माकुणसार ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी व बाधीत शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांचा मोबदला रेल्वे डीएफसीसीकडून न मिळाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कपासे ओव्हर ब्रीज ते करसोंडा येथील होणारा रस्ता आमच्या फायद्याचा नसून रस्त्यामुळे आमची शेती व घरे पाण्याखाली जाणार आहेत. त्यामुळे हा रस्ता करण्यास आमचा विरोध आहे.– चंद्रकांत शुरूम, बाधित शेतकरी (करसोंडा)