Friday, January 17, 2025
Homeमहत्वाची बातमीहम में है दम!

हम में है दम!

श्रीशा वागळे

बॅडमिंटन जगतातली अत्यंत प्रतिष्ठेची अशी थॉमस चषक स्पर्धा यंदा भारतीय संघाने १४ वेळच्या थॉमस चषक विजेत्या इंडोनेशियाचा पराभव करून जिंकली. हा विजय म्हणजे भारतीय बॅडमिंटन विश्वासाठी नवी पहाटच जणू. जागतिक बॅडमिंटनमधल्या भारताच्या वर्चस्ववादाची ही नांदी ठरू शकते. भारतीय बॅडमिंटनला नवी दिशा देण्यास कारणीभूत ठरणाऱ्या थॉमस चषक स्पर्धेच्या विजेतेपदानिमित्ताने…

१९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेटचं रूपडंच पालटलं. दोन वेळच्या विश्वविजेत्या बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून भारतीय संघाने इतिहास घडवला. या विजयाने भारतीय क्रिकेटला नवी दिशा दिली. भारतातला तरुणवर्ग क्रिकेटकडे वळला. या विजयानंतर आपण स्वप्नं बघू शकतो आणि ती पूर्णही करू शकतो, हा विश्वास भारतीय तरुणाईच्या मनात जागृत झाला. भारताच्या युवा पुरुष बॅडमिंटनपटूंनी थॉमस चषकावर नाव कोरून भारतीय बॅडमिंटनला नवी दिशा दिली आहे. म्हणूनच या विजयाची तुलना ८३च्या क्रिकेट विश्वचषक विजयाशी करण्याचा मोह प्रशिक्षकांनाही आवरला नाही.

थॉमस चषक जिंकल्यानंतर भारतीय बॅडमिंटनपटूंमध्ये नवा उत्साह संचारेल यात शंका नाही. या विजयामुळे भारतीय बॅडमिंटनचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित हातांमध्ये असल्याची खात्री पटते. भारताचा थॉमस चषक विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. थॉमस चषकाच्या ७३ वर्षांच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच हे विजेतेपद पटकावले. विशेष बाब म्हणजे इंडोनेशियासारख्या तब्बल चौदा वेळा थॉमस चषकावर नाव कोरणाऱ्या संघाचा पराभव करून भारतीय संघाने ही विजयी पताका हाती धरली. बँकॉकच्या भूमीत भारताच्या बॅडमिंटन संघाने तिरंगा फडकवला. हा विजय साधासुधा नाही तर मागील दोन दशकांच्या मेहनतीची, धैर्याची परिणती आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ‘रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल’ असं म्हणतात. भारतीय बॅडमिंटनच्या बाबतीत ही बाब खरी ठरली आहे. भारतीय बॅडमिंटन यशाचं एक एक शिखर पादाक्रांत करत चाललं आहे. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदंबी श्रीकांत, लक्ष्य सेन असे एकापेक्षा एक तेजस्वी तारे भारतीय बॅडमिंटनचं नभांगण झळाळून टाकत आहेत. थॉमस चषक हा भारतीय बॅडमिंटनच्या शिरपेचात खोवला गेलेला आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे.

१९४८-४९ मध्ये थॉमस चषक स्पर्धेला सुरुवात झाली. इंग्लंडचे बॅडमिंटनपटू सर जॉर्ज अॅलन थॉमस यांनी या स्पर्धेच्या आयोजनाला सुरुवात केली. फुटबॉलचा विश्वचषक आणि टेनिसमधल्या डेव्हिस चषकाच्या पार्श्वभूमीवर बॅडमिंटनमध्ये पुरुष खेळाडूंसाठी अशा धाटणीची स्पर्धा असावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यानंतर १९४८-४९ मध्ये इंग्लंडमध्ये पहिली थॉमस चषक स्पर्धा पार पडली. १९८२ पर्यंत ही स्पर्धा तीन वर्षांतून एकदा होत असे. १९८२ नंतर ती दोन वर्षांमधून एकदा आयोजित होऊ लागली. भारत या स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल झाला होता. पाच सामन्यांच्या या अंतिम फेरीतले तीन सामने भारताने जिंकले. त्यापैकी दोन विजय एकेरीत, तर एक विजय दुहेरीत मिळाला. या विजयानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने थॉमस चषकविजेत्या भारतीय संघाला एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. आजवर ऑलिम्पिक, राष्ट्रकुल तसंच आशियाई स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करणाऱ्या बॅडमिंटनपटूंवर बक्षिसांचा वर्षाव केला जायचा. थॉमस चषकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच या स्पर्धांव्यतिरिक्त अन्य स्पर्धा जिंकणाऱ्या बॅडमिंटनपटूंना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यावरून थॉमस चषकाच्या विजयाचं मोल आपल्या लक्षात यावे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भारतीय बॅडमिंटन संघाशी दूरध्वनीवर संवाद साधून अभिनंदन केले.

या स्पर्धेतल्या पहिल्या एकेरी सामन्यात भारताचा होतकरू बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने विजेतेपद पटकावलं. त्यानंतर चिराग शेट्टी आणि सात्त्विक साईराज या बिनीच्या जोडीने दुहेरी सामना जिंकून भारताला पाच सामन्यांमध्ये २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तिसरा एकेरी सामना जिंकून भारताला विजयी आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी किदंबी श्रीकांतच्या अनुभवी खांद्यांवर होती. श्रीकांतने आपल्यावरचा विश्वास सार्थ ठरवला. जागतिक क्रमवारीत अकराव्या क्रमांकावर असणाऱ्या श्रीकांतने मैदानावर आपला सगळा अनुभव पणाला लावला. थॉमस चषक विजयाची चालून आलेली संधी सोडायची नाही, असे मनोमन ठरवूनच तो मैदानात उतरला होता. श्रीकांतने जोनाथन ख्रिस्तीचा २१-१५ आणि २३-२१ असा सरळ पराभव करून विजयाची माळ भारतीय संघाच्या गळ्यात घातली. यानंतर मैदानात एकच जल्लोष पाहायला मिळाला. भारतीय संघाने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच दर्जेदार खेळाचं प्रदर्शन घडवलं आणि नेत्रदीपक कामगिरी करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. साखळी सामन्यात भारताला फक्त चीन-तैपैई या एकमेव संघाकडून २-३ असा पराभव स्वीकारावा लागला. अन्य संघांना भारतीय संघाने अक्षरश: लोळवलं. भारताने साखळी सामन्यात जर्मनी आणि कॅनडा या दोन संघांना ५-० ने हरवलं. उपांत्यपूर्व फेरीतल्या सामन्यात पाच वेळच्या विजेत्या मलेशियावर मात केली. उपांत्य फेरीत ३२ वेळा अंतिम फेरीत पोहोचलेल्या डेन्मार्कच्या संघाला हरवलं. त्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारताच्या खेळाडूंनी इंडोनेशियासारख्या १४ वेळा विजेतेपद पटकावलेल्या संघालाही मात दिली.

भारताचं हे विजेतेपद स्वप्नवत ठरलं. उपांत्य फेरीत २-२ अशी बरोबरी झाल्यानंतर दुखापतग्रस्त असूनही भारताचा एच. एस. प्रणय मैदानावर उतरला. या जखमी वाघाने दुखापतीची पर्वा न करता स्वत:ला मैदानावर झोकून दिलं. डेन्मार्कच्या रासमुस गेमकेशी एक तास १३ मिनिटं झुंज दिली आणि अखेर विजय मिळवून भारताला अंतिम फेरीत पोहोचवलं. आजवर ३२ वेळा थॉमस कप स्पर्धा आयोजित करण्यात आली असून आत्तापर्यंत फक्त पाच देशांच्या संघांना या करंडकावर नाव कोरण्यात यश आलं आहे. थॉमस चषकावर नाव कोरणारा भारत हा सहावा देश ठरला आहे. इंडोनेशिया हा थॉमस चषकातला सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी १४ वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. १९८२ पासून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आणि बॅडमिंटनमध्ये मक्तेदारी गाजवणाऱ्या चीनने दहा वेळा तर मलेशियाने पाच वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. जपान आणि डेन्मार्क यांना प्रत्येकी एक विजेतेपद मिळालं आहे. आजवर थॉमस चषकावर आशियाई संघांनी वर्चस्व गाजवल्याचं पाहायला मिळालं आहे. आता ही स्पर्धा जिंकणारा भारत हा आणखी एक आशियाई संघ ठरला आहे. भारताने पटकावलेला थॉमस चषक हा योगायोग किंवा नशिबाने मिळालेला विजय नाही. या विजयामागे खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अथक परिश्रम आहेत. थॉमस चषकासारख्या प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या स्पर्धेत विजयश्री मिळवून देणारे खेळाडू घडवणं निश्चितच सोपं नव्हतं. पुलेला गोपीचंद आणि अन्य प्रशिक्षकांनी भारतातली बॅडमिंटनची गुणवत्ता हेरून या हिऱ्यांना पैलू पाडले. आज या हिऱ्यांची चमक सर्वदूर पसरली आहे. भारताला थॉमस चषकाच्या विजेतेपदाची प्रतीक्षा होतीच प्रतीक्षेचा हा कालावधी थोडा लांबला इतकंच…

भारतीय बॅडमिंटन विश्वात आता उत्साहाचे, चैतन्याचे वारे वाहत आहेत. इंडोनेशिया, चीन, जपान, तैपैई, मलेशिया, डेन्मार्कसारख्या बॅडमिंटनमधल्या दादा देशांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय बॅडमिंटनपटू खेळत आहेत. याआधी थॉमस चषकात नऊ सामने खेळवले जात असत. त्यामुळे एखाद् दुसऱ्या दर्जेदार खेळाडूसह भारताला ही स्पर्धा जिंकणं शक्य होत नव्हतं. प्रचंड ताकदीने स्पर्धेत उतरणाऱ्या दादा देशांच्या संघांवर मात करणं भारतीय संघाला शक्य होत नव्हतं. याच कारणामुळे थॉमस चषकाच्या विजयाचं स्वप्न थोडं उशिराने साकारलं. मात्र दर्जाच्या बाबतीत आपण थोडे मागे पडत होतो. थॉमस चषकासारखी स्पर्धा जिंकण्यासाठी एक-दोन खेळाडूंवर अवलंबून राहून चालत नाही. भारताकडे बॅडमिंटनमधली आंतरराष्ट्रीय स्तरावरची गुणवत्ता होती. पण एका कालखंडात एखादाच दर्जेदार खेळाडू निपजायचा. नंदू नाटेकर हे स्वतंत्र भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटनपटू. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारे ते पहिलेच भारतीय खेळाडू होते. त्यानंतर प्रकाश पदुकोण यांनी बॅडमिंटन विश्व गाजवलं. त्यांनी १९८० मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. १९८१ च्या विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम फेरीतला त्यांचा विजयही चाहत्यांच्या स्मरणात आहे.

त्यानंतर सय्यद मोदी आणि विमलकुमार यांनी पदुकोण यांचा वारसा चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पदुकोण यांच्याइतकी उंची गाठता आली नाही. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी म्हणजे २००१ मध्ये पुलेला गोपीचंदने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. गोपीचंदने एक प्रशिक्षक म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या अकादमीने दर्जेदार आणि विश्वविजयी बॅडमिंटनपटू घडवले. आजघडीला भारताच्या जवळपास दहा खेळाडूंनी बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या २५ जणांमध्ये स्थान पटकावलं आहे आणि हेच आपल्या थॉमस चषक विजयाचं गुपित आहे. हे दहा आघाडीचे खेळाडू गोपीचंदच्या अकादमीतूनच घडले आहेत. येत्या काळात भारतीय बॅडमिंटनपटूंनी जागतिक बॅडमिंटन विश्वावर अधिराज्य गाजवल्यास आश्चर्य वाटायला नको!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -