बोईसर (वार्ताहर) : उत्पादन शुल्क विभागाकडून डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खानवेल-किन्हवली रस्त्यावरील किन्हवली गावच्या हद्दीत सोमवारी रात्री दमण बनावटीच्या दारू तस्करीवर कारवाईसाठी लावलेल्या नाकाबंदीदरम्यान दारू तस्करांनी शासकीय वाहनांना धडक देत वाहन सोडून पळून जाताना त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३६३ बल्क लिटर दमण बनावटीच्या दारूसह ८ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल असून न्यायालयाकडून त्यांना दोन दिवसांची उत्पादन शुल्क विभागाची कोठडी सुनावली आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रात्री साडेनऊ वाजता संशयास्पद असलेल्या महिंद्रा जीपला थांबण्याचा इशारा केला असता जीपचालकाने पळून जाण्याच्या प्रयत्नात शासकीय वाहनाला धडक दिली. थोड्या अंतरावर त्यांचे वाहन बंद पडल्याने वाहन सोडून जंगलात पळून जात होते. यावेळी कर्तव्यावर असलेले जवान बी. बी. कराड आणि एस. एस. पवार यांनी पाठलाग करीत जीपचालक शंकर धाकल कोरडा याला ताब्यात घेतले.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ३६३ बल्क लिटर दमण बनावटीच्या दारूचा साठा आढळून आला. वाहनासह दारूचा साठा मिळून ८ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. विठ्ठल भुकन यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक उदय शिंदे, पांडुरंग पडवळ, जवान भाऊसाहेब कराड, संदीप पवार, प्रशांत निकुंभ, अनिल पाटील यांच्या पथकाने केली आहे. कारवाईदरम्यान दापचरी सीमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक कुडकर, निरीक्षक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली.
अटक आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, पळवून गेलेला आरोपी दिलीप रांधडा याने केंद्रशासित प्रदेशातील खानवेल येथून खरेदी करून घरी लग्नकार्यात येणाऱ्या पाहुण्यांना देण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.