अमरावती : अनिल परब यांच्या घरावर ईडीने छापेमारी केल्यावरून आमदार रवी राणा यांनी परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनिल परब हा मातोश्रीचा खजिनदार आहे. सरकारमधील कलेक्शन करून मातोश्रीवर नोंद ठेवण्याची मोठी जबाबदारी ते पार पाडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हाताशी घेऊन त्यांनी अनेक वाईट काम केली आहेत. आता त्यांच्या पापाचा घडा भरला आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली आहे.
सचिन वाझेच्या माध्यमातून अनिल परब यांनी अनेक कामे करून घेतली. मोठ्या प्रमाणावर एसटी महामंडळात अनिल परबनी भ्रष्टाचार केला, असा आरोपही रवी राणा यांनी केला आहे.
अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा छळ केला. एसटी कर्मचाऱ्यांनी आपली दिवाळीही साजरी केली नाही. त्यांची दिवाळी अंधारात गेली. पाच-सहा महिने त्यांनी आंदोलन केले. पण अनिल परब यांनी उद्धट भाषेत आणि अहंकारातून एसटी कर्मचाऱ्यांचा छळ केला. त्यामुळे दीडशेच्यावर एसटी कामगारांनी आत्महत्या केली. त्या सगळ्यांची बद्दुआ ही अनिल परब यांना लागणार आहे. अनेक कारस्थानं अनिल परबनी राज्यात केली आहेत. या सगळ्यांचा भंडाफोड होणार आणि अनिल परब तुरुंगात जाणार याचे पूर्ण संकेत आहेत, असा दावा रवी राणा यांनी केला.
मराठी माणसांना फसवून आणि मराठी माणसांच्या टाळूवरचे लोणी खाणारा हा अनिल परब गजाआड जाईल. परबानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांचेही कारनामे बाहेर येतील. एवढच काय तर संजय राऊत यांचेही कारनामे उघड होतील, असा आम्हाला विश्वास आहे. निःपक्षपणे ईडी ही कारवाई करेल आणि या भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकेल, असे आमदार रवी राणा म्हणाले.