मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासहित सात ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांनी छापा टाकल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी लाडू वाटून जल्लोष करत आनंद व्यक्त केला. त्यानंतर सदावर्ते यांनी अनिल परब यांच्यावर मुक्ताफळे उधळली आहेत.
“ही तर कर्माची फळं, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि वाण नाही पण गुण लागला” अशी बोचरी टीका सदावर्ते यांनी परबांवर केली आहे. “एसटी कर्मचाऱ्यांची हळहळ आणि तळतळीचे हे परिणाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे पद दुसऱ्याला द्यायला पाहिजे होते,” असे म्हणत सदावर्ते यांनी आपले मत व्यक्त केले.
“लवासा घोटाळा, सिंचन घोटाळा आणि आदर्श घोटाळा करणाऱ्या लोकांच्या सोबत राहिल्यावर हा गुण लागणारच, वाण नाही पण गुण लागतोच” असे म्हणत त्यांनी आता मनी लाँडरिंग प्रकरणातील गुन्ह्याची उकल होणार आहे, असे ते म्हणाले. हा आनंद व्यक्त करताना त्यांच्यासोबत एसटी कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनीही एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला.
त्याचबरोबर एका बॅंक घोटाळ्याच्या प्रकरणी जयश्री पाटील कोर्टात तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.