
वाडा (वार्ताहर) : वाडा तालुक्यातील नेहरोली व कंचाडजवळ बुधवारी झालेल्या दोन अपघातांत तिघांना जीव गमवावा लागला. भिवंडी-वाडा मार्गावर नेहरोली येथे रस्ता दुरुस्तीचे काम चालू आहे. तिथे एकेरी वाहतूक सुरू आहे. यावेळी विरुद्ध मार्गाने कुडूसहून येणाऱ्या ट्रकने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीचालक मनीष परदेशी (वय,३०) हे गंभीर जखमी झाले. त्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.
दुसरा अपघात वाडा-मनोर महामार्गावरील कंचाड हद्दीतील फणसपाडा येथे घडला. मनोरच्या दिशेकडून कंचाडकडे येत असलेल्या दुचाकीवरील दोघांचा अपघात झाला. अपघाताच्या ठिकाणी रस्तादुरुस्तीचे काम चालू आहे. याठिकाणी सावधानतेचे फलक, बॅरेकेट्स लावलेले नसल्याने दोघे तरुण रस्त्यावर पडल्यानंतर त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेत योगेश सुभाष गोवारी (वय, २३), किरण यशवंत बाने (वय, २०) या दोघांचा मृत्यू झाला. अपघातास जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.