मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पश्चिम उपनगरातील पावसाळापूर्व कामांची पाहणी केली आहे. दरम्यान या पाहणीमध्ये पश्चिम उपनगरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यात आली आहे.
या पाहणी दरम्यान ‘परिमंडळ ७’ च्या उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, सहाय्यक आयुक्त संतोष कुमार धोंडे, सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) अशोक मिस्त्री, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर उपस्थित होते. दरम्यान या पाहणी दौऱ्यात मिलन सब-वे लगत उभारण्यात येत असलेल्या साठवण जलाशयाच्या कामाची पाहणी करण्यात आली आहे. या परिसरात पावसाळ्यात पाण्याचा निचरा संथगतीने होत असतो. यासाठी येथे तब्बल दोन कोटी लिटर क्षमतेचे ‘साठवण जलाशय’ उभारण्यात येत आहे. ही कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
तसेच अंधेरी पूर्व परिसरातील नवीन उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असून तेली गल्लीपासून ते गोखले उड्डाणपुलापर्यंतच्या रस्त्यावरून नवीन उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. हा पूल ५७० मीटर लांब व १७ मीटर रुंदीचा असणार आहे. तर आरे कॉलनीतील पर्यावरण पूर विकासाचे उत्तम उदाहरण ठरणाऱ्या गोरेगावातील दिनकरराव देसाई मार्गासह (आरे कॉलनी मार्ग) परिसरातील विविध रस्त्यांची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. यावेळी नालेसफाईच्या कामांचीही पाहणी करण्यात आली असून शास्त्रीनगर नाला येथील सफाई कामांची पाहणी केली आहे. दरम्यान, पोईसर नदीलगत बांधण्यात येणारी संरक्षक भिंत बांधकामात अडथळा ठरणारी २९ बांधकामे नुकतीच हटविण्यात आली आहेत.
पोईसर नदीवरील नवीन उड्डाणपुलाचीही उभारणी सुरू आहे. बोरिवली पश्चिम परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाचाही आढावा यावेळी आढावा घेण्यात आला असून तब्बल ९३७ मीटर लांब आणि १५.३ मीटर रुंद असणाऱ्या या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे, तर मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाळ्यादरम्यान समस्या निर्माण होऊ नये यासाठी सगळ्याच कामांचा आढावा पालिकेने घेतला आहे.