मानसिक संतुलन सांभाळा अन् स्वत:चे आयुष्य घडवा

Share

मीनाक्षी जगदाळे

समाजाने मानसिक आरोग्य सांभाळणे किती अनिवार्य झालेले आहे आणि स्वतःवर वैचारिक संयम मिळवणे, स्वतःच्या भावनांना आवर घालणे आवश्यक आहे. आपल्याला इतके सुंदर आयुष्य मिळून देखील देशासाठी नाही, समाजासाठी नाही, इतरांसाठी नाही, पण स्वतःसाठीसुद्धा आपल्याला धड जगता येऊ नये. या पोखरलेल्या, उद्विग्न झालेल्या मानसिकतेला काय म्हणावे. कितीही मनाविरुद्ध परिस्थिती असली तरी त्यावर मात करणे जमलेच पाहिजे, तरच आयुष्य सुखकर होईल.

आजकाल अशा आत्महत्या वाढण्याच्या मागील कारणे जर शोधली, तर अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी कुठे तरी आपणच जबाबदार असतो असे वाटते. खूप लवकर मोठे होण्याचे स्वप्न पाहणे, त्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करण्याची तयारी नसणे, उच्च जीवनशैली मिळण्यासाठी सतत कर्ज काढत राहणे, आहे त्यात समाधानी न राहता चुकीचे आर्थिक व्यवहार करून त्याची परतफेड न करता आपले आयुष्य संपवणे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. थोडाही तणाव आला की, व्यसनांचा सहारा घेणे, त्यातून अतिशय तरुण वयापासूनच तब्येतीच्या समस्या उद्भवायला सुरुवात होणे, स्वतःहून चुकीच्या मार्गाने पैसे मिळविण्यासाठी चुकीच्या कृतींमध्ये सहभागी होणे, बेकायदेशीर काम करणाऱ्यांची संगत धरणे, कुटुंबापासून लपवून परस्पर बाहेर उधाऱ्या, व्याजाने पैसे घेणे, खोटी कागदपत्रे बनवणे, खोट्या फसव्या आर्थिक योजना याला बळी पडणे, चुकीच्या ठिकाणी आपले पैसे गुंतवणूक करणे, घर, शेती, मालमत्ता गहाण ठेवणे आणि यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग राहिला नाही की मृत्यूला कवटाळणे हा अनेकांच्या आयुष्याचा भाग झालेला आहे.

घरातील एखाद्या माणसाच्या चुकीची शिक्षा मात्र संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागते आणि इच्छा असो, नसो मृत्यूला जवळ करावे लागते. अशा प्रकारच्या सामुदायिक आत्महत्यांमध्ये लहान मुलांचा तर हकनाक बळी जातो. त्यांची काहीही चूक नसताना, त्यांना परिस्थितीची यत्किंचितही जाणीव नसताना आई-वडील स्वतः केवळ स्वतःच्या चुकांची शिक्षा मुलांनादेखील जीवे मारून टाकतात. कोणत्याही स्वरूपाचे मोठे आर्थिक संकट, कर्जबाजारी होणे, प्रकृतीच्या समस्या, आजारपणाची भीती, असहाय आजार, भाऊबंद, नातेवाईक यांचा मानसिक त्रास, नोकरीच्या ठिकाणी मिळणारी उपेक्षित वागणूक, अपमान, समाजातून दिला गेलेला अथवा करून घेतलेला त्रास, कोणत्याही कारणास्तव समाजात झालेली नामुष्की, कोणाकडून आपल्यावर अन्याय झाल्याची भावना, मिळणारी अपमानास्पद वागणूक त्यातून होणारे मानसिक खच्चीकरण, पती-पत्नीमध्ये कोणाचे विवाहबाह्य संबंध उघडकीस येणे, उद्योग व्यवसायात येणारा तोटा या सर्वसाधारण कारणांमुळे सामुदायिक आत्महत्या अथवा कुटुंबप्रमुखाने सर्वांना जीवे मारून स्वतःचे जीवन संपवणे यांसारख्या घटना घडताना दिसतात. या जगात कोणालाच स्वतःच्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे, स्वप्नवत शंभर टक्के जीवन जगता येत नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या-वाईट दोन्ही बाजू असतात. आयुष्य म्हटले की अडथळे, आव्हाने, अघटित अनपेक्षित घटना या आल्याचे ते कोणालाही चुकलेले नाही. हे आपल्या सर्वांना ठाऊक असते. तरीही कळतंय पण वळत नाही, अशी मानसिकता तयार होऊन माणूस इतका का खचतो की त्याचा स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःवर देखील विश्वास राहत नाही.

नकारात्मक परिस्थितीशी लढणे, त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे, सकारात्मक लोकांच्या सहवासात राहणे, त्यांच्याकडून प्रेरणा घेणे, अडी-अडचणींवर मात करून पुन्हा उभे राहिलेल्या, शून्यातून विश्व निर्माण केलेल्या लोकांचा सल्ला घेणे आणि आपले आयुष्य वेळेत सावरणे हे चांगल्या सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांना देखील का जमू नये? हा प्रश्न आजही अनुत्तरित राहतो. त्यामुळे आपल्या जवळच्या, विश्वासू लोकांशी मनमोकळे बोला, चर्चा करा, चुका असल्यास मान्य करा, त्यावर सल्लामसलत करा, मार्ग काढा. पण मृत्यूला कवटाळून आपल्या माघारी जिवंत राहणाऱ्या लोकांना आयुष्यभरासाठी वेदना देऊन जाऊ नका. आपण आत्महत्या केल्यावर देखील लोक आपल्याबद्दल उलटसुलट चर्चा करणारच आहेत, आपल्याला दोष देणारच आहेत, आपल्या घरच्यांना लोकांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला लावण्यापेक्षाही स्वतः आव्हान स्वीकारून परिस्थितीशी दोन हात करा आणि प्रत्येक चांगल्या वाईट अनुभवातून स्वतःचे आयुष्य घडवा.

meenonline@gmail.com

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

14 minutes ago

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…

39 minutes ago

Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…

47 minutes ago

Gond Katira: दगडासारखी दिसणारी ही गोष्ट उन्हाळ्यात आहे अतिशय फायदेशीर

मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…

1 hour ago

Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…

2 hours ago

Lalit Machanda Suicide: ‘तारक मेहता….’ फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी ‘या’ कारणांमुळे केली आत्महत्या

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…

2 hours ago