Thursday, July 25, 2024
Homeक्रीडागुजरातला विजयाचे वेड

गुजरातला विजयाचे वेड

राजस्थानला नमवून फायनलमध्ये प्रवेश; राशिद, मिलर चमकले

कोलकाता (वृत्तसंस्था) : राशीद खानची धावा रोखणारी गोलंदाजी आणि डेव्हिड मिलरच्या तुफानी फलंदाजीमुळे मंगळवारी गुजरातने राजस्थानला चीत करत पदार्पणातच आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा कर्तब केला आहे. राजस्थानला दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेशाची संधी आहे.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या गुजरातला चांगली सुरुवात मिळाली नाही. भोपळाही न फोडता रिद्धीमान साहा तंबूत परतला. शुबमन गिल आणि मॅथ्यू वेड ही जोडी गुजरातसाठी धावून आली. शुबमनचा धडाका आणि वेडचा संयम जुळून आला. त्यामुळे गुजरातच्या धावफलकावर अर्धशतक पार झाले. ही जोडी गुजरातला विजय मिळवून देणार असे वाटत होते, पण दुसरी धाव घेण्याच्या नादात गिल फसला आणि राजस्थानला आणखी एक बळी मिळाला. त्यानंतर वेडही फार काळ थांबला नाही.

गिल आणि वेड दोघांनीही वैयक्तिक ३५ धावा जमवल्या. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यावर गुजरातच्या विजयाची जबाबदारी कर्णधार हार्दीक पंड्या आणि डेव्हीड मिलर यांच्या खांद्यावर आली. या दोन्ही अनुभवी फलंदाजांनी ही जबाबदारी चोख पार पाडत गुजरातला विजय मिळवून दिला. डेव्हीड मिलरने ३८ चेंडूंत नाबाद ६८ धावांची तुफानी फलंदाजी केली, तर पंड्याने २७ चेंडूंत नाबाद ४० धावांची कामगिरी केली. शेवटच्या षटकात १६ धावांची आवश्यकता असताना मिलरने पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकत गुजरातला विजयी केले. गुजरातने १९.३ षटकांत १८९ धावांचे लक्ष्य गाठले.

राजस्थानची सुरुवात खराब झाली असली तरी जोस बटलरची बॅट मंगळवारी चांगलीच तळपली. दुसऱ्याच षटकात यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसनने फलंदाजीची सूत्रे हाती घेत धावांचा वेग वाढवला. दोघेही गुजरातच्या फलंदाजांवर तुटून पटले. बटलरचे शतक थोडक्यात हुकले. त्याने ५६ चेंडूंत ८९ धावांची मोठी खेळी खेळली. बटलरला सॅमसनने चांगली साथ दिली. सॅमसनने ५ चौकार आणि ३ षटकार लगावत २६ चेंडूंत ४७ धावांचे योगदान दिले. बटलर-सॅमसन जोडीच्या धडाकेबाज कामगिरीमुळे राजस्थानने २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १८८ धावांचा डोंगर उभा केला. पडिक्कलने २० चेंडूंत २८ धावांची झटपट खेळी खेळली.

ईडन गार्डनच्या फलंदाजांना अनुकूल अशा खेळपट्टीवर राशीद खान वगळता गुजरातचे अन्य गोलंदाज अपयशी ठरले. राशीद खानने ४ षटकांत अवघ्या १५ धावा देत गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात तोच गुजरातचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अन्य गोलंदाजांना फटके पडत असताना कर्णधार हार्दीक पंड्याने २ षटकांत १४ धावा देत १ बळी मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -