Friday, July 19, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व

कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व

अरुण बेतकेकर

आलीकडेच १४ मे रोजी नारायण राणे यांना भेटण्यासाठी त्यांच्या जुहूस्थित निवासस्थानी गेलो होतो. त्यांच्या पत्नी निलमवहिनी कार्यालयाबाहेरील पॅसेजमध्ये येरझाऱ्या घालताना दिसल्या. त्यानंतर मी राणेंना भेटण्यासाठी आत गेलो. चर्चेअंती काही वेळानंतर आम्ही एकत्र बाहेर पडलो असता वहिनी त्याच ठिकाणी होत्या. त्यांना पाहताच राणे आनंदी झाले. राणेंच्यातील तरुण जागा झालेला मी अनुभवला. वहिनींच्या मागे दोन-चार पावले लगबगीने टाकत त्यांनी त्यांच्या पाठमोऱ्या खांद्यावर थाप दिली व थट्टेच्या सुरात म्हणाले, ‘Best of Luck’, त्या म्हणाल्या, कशासाठी?

ते उत्तरले, “आज ‘प्रहार’मध्ये तुझी मुलाखत आहे ना? त्यासाठी माझ्या शुभेच्छा तुझ्याबरोबर आहेत.” मी अंदाज बांधला, त्यांच्याच वाढदिवसानिमित्त प्रहार वृत्तपत्रात त्यांची मुलाखत छापली जाणार असावी. घरातीलच छोटासा मामला पण आनंद देऊन गेला. त्यातून घरातील वातावरण किती खेळीमेळीचे असावे, याचा लागलीच अंदाज आला. अशा घटनांकडे पाहण्याचा आमचाही दृष्टिकोन काहीसा वेगळा असतो. त्याच क्षणी सिनेमातला आपल्या पत्नीशी हलकीशी थट्टा करणारा आनंदी देव आनंद मला आठवला. सांगायचे असे, नारायण राणे यांना आपण जाणतो, पाहतो, एक रागीट, शीघ्रकोपी व्यक्ती म्हणून. मुळात ते तसे नाहीत. पण या प्रसंगी त्यांच्यातील वेगळेपण दिसले. घरातील या आनंदी वातावरणाचे खरे श्रेय निलमवहिनींनाच द्यावे लागेल. घरातील घरपण हे घरातील स्त्रीमुळे जोपासले जाते, सजवले जाते. हा अनुभव सुखावणारा होता. दोघांतील देहबोलीतूनच लक्षात आले की, या घरात लक्ष्मीबरोबरच सरस्वतीही वास्तव्य करते.

नारायण राणे यांच्याप्रमाणेच माझे स्वतःचेही ऐनभरातील तारुण्य राजकारणात गेले. प्रामुख्याने सर्वस्वी वाहून घेतलेल्या राजकारण्याप्रमाणे. त्यास्तव त्या काळात घरची अन् घरच्यांची परिस्थिती, मानसिकता, ताण-तणाव कसा असतो याचा मला पुरेपूर अनुभव आहे. प्रामुख्याने अपत्यांचे संगोपन हे तर अतिशय संवेदनशील आणि संस्काराची ही जबाबदारी सर्वस्वी वहिनींनी लीलया पेललेली जाणवते. त्यांची दोन्ही अपत्ये जीवनात यशस्वी आहेत. विदेशातून उच्चशिक्षित, उत्तम चरित्र अन् निर्व्यसनी. बहुतांश राजकारण्यांची मुले ही बिघडतील व कुचेष्ठेचे धनी. पण राणेंच्या बाबतीत हा अपवाद आहे. राणे कुटुंब राजकारणात यशस्वी वाटचाल करीत आहे. त्याचबरोबर त्यांच्या उद्योग-व्यवसायाची व्याप्तीही खूप मोठी आहे. याच्या व्यवस्थापनातही निलमवहिनींचा महत्त्वाचा सहभाग असतो.

राजकारणाबाबत बोलायचे झाले, तर मुळात नारायण राणे शिवसेनेचे. स्वप्नातही कोणी कल्पना केली नसावी की, राणे पुढे काँग्रेसी होतील व त्यानंतर भाजपमध्ये स्थिरावतील, तेही प्रत्येक वेळी यशस्वी होत. राणे प्रथम दर्शनीय वाटतात की, असे निर्णय ते एकट्याने घेत असावेत. पण घरचे वातावरण तसे नाही. सर्व निर्णय हे सामूहिक, कुटुंब सदस्यांशी चर्चा, सल्ला-मसलत करूनच घेतले जातात. या प्रक्रियेतही निलमवहिनींची भूमिका महत्त्वाची असते. याचाच अर्थ त्या क्षणोक्षणी अनपेक्षित बदलत राहणाऱ्या भारतीय राजकीय परििस्थतीवर बारीक लक्ष ठेवून असाव्यात. राणेंसह संसार थाटला, त्यानंतरचा बराच काळ जेव्हा शिवसेनेकडे निवडणूक लढण्यास उत्सुक उमेदवार नसायचे. अशा वेळी अन्य राजकीय कुटुंबाप्रमाणे त्यांना राजकारणात प्रवेश करणे सहज शक्य होते. पण त्यांनी कटुंबवत्सलता राखत कुटुंबास प्राधान्य दिले.

मुळात राणे हे मध्यमवर्गीय कष्ट करत यशस्वी झालेले कुटुंब. राजकारणामुळे गरिबातला गरीब, तर श्रीमंतासह कुबेर यांचा सतत वावर. पण दोघांशीही समान उच्च दर्जा राखत त्यांची खातरदारी करण्याची तारेवरची कसरत वहिनी लीलया पेलताना दिसतात. कुटुंबात वाहिनीच्या अट्टहासाने काही प्रथा-पायंडे काटेकोरपणे पाळले जातात. प्रत्येकाच्या वाढदिवसाला सारे कुटुंबीय एकत्र होऊन तो साजरा करतात. घरात शिजलेलेच जेवण्याची प्रथा असल्याने प्रत्येकजण बाहेर असले तरी घरचा डबा घेऊनच बाहेर पडतात. मुंबईत असल्यास रात्रीचे जेवण एकत्र जेवण्याचा पायंडा पाडलेला आहे. यातूनच ‘Family who eat together, stays together’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय या कुटुंबाकडे पाहून पदोपदी येतो. आजही वहिनींचा एकंदर वावर पाहता पाय जमिनीवर व डोके खांद्यावर असाच सहज सुंदर आहे. ज्या-ज्या वेळी त्यांच्या निवासस्थानी जातो त्या-त्या वेळी त्या आवर्जून निदर्शनास पडतात. आपल्या भव्य-दिव्य निवासाची शोभा, स्वच्छतेकडे त्या जातीने लक्ष देताना दिसतात. आपल्या कर्मचाऱ्यांसह आपुलकीने वागता-बोलताना आढळतात.

‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ हेच या कुटुंबाच्या यशाचे गमक आहे. घर-संसार, कुटुंबवत्सल, संस्कार, व्यवस्थापक, राजकारणाचा अभ्यास, उद्योग व्यवसाय आणि लोकांशी प्रेमळ वावर असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. बुधवार, २५ मे हा निलमवहिनींचा वाढदिवस, त्यानिमित्त मी त्यांना अखंड सौभाग्यासह उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -