Friday, July 19, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरड्रग्जमाफियांची तरुणाला बेदम मारहाण

ड्रग्जमाफियांची तरुणाला बेदम मारहाण

बोईसरमधून आरोपींना घेतले ताब्यात

बोईसर (वार्ताहर) : शहरात ड्रग्जमाफियांनी दहशत निर्माण केली आहे. तुरुंगातून सुटून आलेल्या माफियाने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. भंडारवाडा येथील काही स्थानिकांनी एकत्र येत ड्रग्जमाफियाविरोधात बोईसर पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीचा राग मनात धरून यातील एका तक्रारदारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

बोईसर शहरात ड्रग्जमाफिया सक्रिय झाल्याने भंडारवाडा येथील नागरिकांनी बोईसर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे ८ जुलै २०२१ रोजी लेखी तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात धरून ड्रग्जमाफिया नीलेश सुर्वे व त्याच्या साथीदारांनी मंगळवारी १७ मे २०२२ रोजी मधुर हॉटेलसमोरून जाणाऱ्या तक्रारदार मुबारक खान याला रस्त्यावर अडवून बेदम मारहाण केली.

मुबारकला बळजबरीने दुचाकीवर बसवून त्याला यशवंतसृष्टी येथे रेल्वे धक्याजवळील साईबाबा मंदिर भागात नेले. याठिकाणी पुन्हा मारहाण करून सायंकाळपर्यंत डांबून ठेवले होते. तिथून मुबारकने पळ काढला. मित्राच्या घरी जाऊन त्याच्यासोबत थेट बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला असता बोईसर पोलीस स्टेशनमधील काही कर्मचाऱ्यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचे मुबारकने सांगितले.

याबाबत काही स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा यांनी तपास आपल्याकडे घेत आरोपींना तातडीने ताब्यात घेतले. नीलेश सुर्वे, सोनु भोसले, विनोद माने, अन्या, काळु व इतर १० ते १२ अनोळखी इसमांवर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -