मुंबई (प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम प्रकरणी राणा दाम्पत्याला दिंडोशी न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई महापालिकेने राणा दाम्पत्य राहत असलेल्या खार येथील घरात अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस बजावली होती. मात्र आता दिंडोशी न्यायालयाने राणा दाम्पत्याला घरातील अनधिकृत बांधकाम नियमित करून घेण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याच्या खार पश्चिम येथील लाव्ही इमारतीतील घरात अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस पालिकेने बजावली होती. त्यानंतर दोन वेळा पालिकेचे पथक तपासणीसाठी गेले हाते. मात्र घरात कोणी नसल्यामुळे तपासणी न करताच पथकाला परतावे लागले होते.
तिसऱ्या वेळी पालिकेच्या पाहणी पथकाला घरात अनधिकृत बांधकाम आढळले. त्यानंतर १५ दिवसांत हे बांधकाम पाडा अन्यथा आम्ही पाडू असा अल्टीमेटम पालिकेने राणा दाम्पत्याला दिला होता. नोटीसीला राणा दाम्पत्याने दिंडोशी न्यायालयात आव्हान दिले होते. दिंडोशी न्यायालयाने राणा दाम्पत्याला घरातील अनधिकृत बांधकाम नियमित करून घेण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आपण आपल्या घरातील बांधकाम नियमित करून घेऊ असे राणा दाम्पत्याने न्यायालयात सांगितले आहे.