मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. एकदा देशाला कळू द्या की, ओबीसींची संख्या किती आहे, असे आव्हानही पवार यांनी दिले आहे.
मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी मेळावा संपन्न झाला. त्यावेळी पवार बोलत होते. शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपवरही निशाणा साधला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू आहे. त्याचा समाचारही पवार यांनी आपल्या भाषणात घेतला. भाजप नेते सांगतात महविकास आघडी सरकारने धोका दिला आहे. मग माझा सवाल आहे मागच्या पाच वर्षात तुम्ही झोपला होतात का? असा उलट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ओबीसी समाजाच्या लोकसंख्येबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आज ओबीसी जनगणनेची मागणी होते आहे. एकदा देशाला कळू द्या की किती ओबीसी संख्या आहे. बिहारमधील मुख्यमंत्री यांनी देखील मागणी केली असल्याची आठवण शरद पवार यांनी करून दिली. मात्र, केंद्रातील सरकार हे ओबीसींची जनगणना होऊ देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. संघाचे भैय्याजी जोशी यांनी ओबीसी जनगणना मान्य नसल्याचे सांगितले होते. ओबीसी जनगणना झाल्यास त्याने देशात अस्वस्थता निर्माण होईल, असे त्यांनी म्हटले होते. मात्र ओबीसींच्या जनगणनेनुसार काही सत्य समोर येईल, असेही पवार यांनी सांगितले.
आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय शांत राहणार नाही, ओबीसींच्या हक्कासाठी ज्या गोष्टी करता येतील त्या नक्की करणार असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी यावेळी दिले.