मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने हे आरक्षण परत मिळवले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारनेही त्याच पार्श्वभूमीवर निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासाठीच महाराष्ट्र भाजपा आक्रमक झाली असून मुंबई कार्यालय ते मंत्रालय असा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व योगेश टिळेकर यांनी केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, गोपिचंद पडळकर, असे अनेक प्रमुख नेते या मोर्चात सहभागी झाले. या मोर्चामध्ये महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, भाजपा कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाचीही झाली.
भाजपाच्या नेत्यांसह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर काही महिला कार्यकर्ते आणि इतर आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपा कार्यालयासमोर या महिला कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडलेला होता.