मुंबई (प्रतिनिधी) : बेस्ट उपक्रमाकडून सध्या खासगी बस चालवल्या जातात या खासगी बसवर महिला बस चालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मी जाधव असे या महिला चालकाचे नाव असून सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.
बेस्ट उपक्रमात अनेक आगारात सध्या खासगी बस चालवल्या जातात या खासगी बसवर कंत्राटी बस चालक म्हणून लक्ष्मी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच त्या सेवेत दाखल होणार आहेत. सध्या त्यांचे प्रशिक्षण सुरू असून मजास आगार ते धारावी अशी त्या बस चालवत आहे. खासगी मालकाकडून बेस्ट बससाठी तीन महिला चालकांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यापैकी लक्ष्मी जाधव या एक आहेत. लक्ष्मी जाधव मुलुंड येथील राहणाऱ्या असून त्या आधी रिक्षा देखील चालवायच्या. त्यानंतर मर्सिडिजसारख्या मोठ्या चारचाकी वाहन देखील त्यांनी चालवली आहेत.
मला आधीपासून ड्रायव्हिंगची आवड होती आणि त्यामुळे मी २०१५ ला लायसेन्स काढून घेतले आणि २०१६ पासून रिक्षा चालवत आहे. मात्र आता कायमस्वरूपी नोकरीच्या विचाराने बेस्टमध्ये बसमध्ये बस चालक म्हणून नियुक्त झाली आहे, असे लक्ष्मी जाधव यांनी म्हटले आहे.
दरम्यान बेस्टमध्ये काही वर्षांपूर्वी ९० महिला बस वाचकांची भरती करण्यात आली होती, मात्र कालांतराने त्या महिलांना डेपोमधील काम देण्यात आले. मात्र आता पहिल्यांदा चालक म्हणून बेस्टमध्ये कंत्राटी कामगार म्हणून लक्ष्मी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर लवकरच त्या सेवेत दाखल होणार आहेत.