मुंबई (प्रतिनिधी) : अन्नपदार्थ तळण्यासाठी खाद्यतेलाचा जास्तीत जास्त २ वेळा वापर करुन संपवावे. जर ते पुन्हा तळण्यासाठी वापरले, तर त्यातील पोलर कंपाउंडचे व ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढून ते आरोग्यावर विपरित परिणाम करते. अन्न पदार्थ तळण्यासाठी खाद्यतेलाचा पुर्नवापर केला तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
अन्न पदार्थ तळण्यासाठी खाद्यतेलाचा पुर्नवापर केला तर त्यामुळे कर्करोग, हृदयविकार व पचनासंबंधी आजार होण्याचा धोका संभव आहे. खाद्यपदार्थ तळण्यासाठी लोखंडी कढई न वापरता स्टिल कढई वापरावी. शक्यतो वनस्पती तेलाचा वापर करावा, खाद्य पदार्थ तळताना अन्न कणे काळपट होण्यापूर्वीच काढून टाकावीत, असे अन्न व औषध प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. जे अन्न व्यावसायिक नियमांचा भंग करुन खाद्यतेलाचा वारंवार वापर करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायदा २००६, नियम व नियमन २०११ अन्वये कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देऊन याची सर्व अन्न व्यवसायिकांनी नोंद घेण्याचे बजावण्यात आले आहे.
दररोज ५० लिटरपेक्षा अधिक तेलाचा वापर करीत असलेल्या व्यवसायिकांनी साठ्याबाबत नोंद ठेवणे बंधनकारक आहे. असे पुनर्वापर करण्यात आलेले व साठवून ठेवलेले खाद्यतेल केंद्रीय अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्ली यांची मान्यता असलेल्या बायोडिझेल उत्पादक कंपनी आणि त्यांचे स्थानिक प्रतिनिधी यांना देणे बंधनकारक आहे. सदर पुनर्वापर केलेल्या खाण्यास अयोग्य असल्याने खाद्यतेल बायोडिझेल उत्पादक सदर कंपनीमार्फत अन्न उत्पादक व्यवसायिकांचे शासन नियमाप्रमाणे सदर खर्चाची रक्कम देण्यात येईल.
मुंबई शहरासाठी मे. E RISK BIO ENERGY यांची स्थानिक प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा दुरध्वनी क्रमांक ९८९२०५४७२५ असा आहे. तसेच वापरुन किती तेल शिल्लक राहिले आहे व तेलाची विल्हेवाट कशी लावली, किंवा शिल्लक तेल हे कोणत्या नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादकाला दिले, या संबंधिची नोंदवही ठेवणे आवश्यक आहे.
याबाबतीत बृहन्मुंबई विभागात ३३ अन्न व्यावसायीकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई नियमित सुरु राहणार असून याची हॉटेल, रेस्टॉरन्टस, फरसाण उत्पादक अन्न व्यावसायीकांनी नोंद घ्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्तांनी हे परिपत्रका जारी केले आहे.