
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग किल्ल्याशेजारी मालवणमधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पर्यटनासाठी गेलेली बोट समुद्रात उलटून अपघात झाला आहे. जय गजानन नावाच्या या बोटीत तब्बल २० पर्यटक होते. त्यातील दोघे पर्यटक बुडल्याची माहिती मिळत असून काही पर्यटक गंभीर जखमी आहेत.
ही बोट जवळपास २० पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती. स्कुबा डायव्हिंग करुन परत येताना समुद्रकिनाऱ्याजवळ बोट बुडाली. यात दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. काही गंभीर जखमींना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे.
प्रशासनाने या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून बोट चालक आणि मालकावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बोटीची प्रवासी क्षमता किती होती, या सर्व पर्यटकांना लाईफ जॅकेट देण्यात आले होते का अशाप्रकारच्या सूचनाही दिल्या आहे. पोलीस आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी हजर आहेत. या दुर्घटनेत कोणताही हलगर्जीपणा झाला असेल तर चालक आणि मालकावर कारवाई केली जाईल, असे सांगितले जात आहे.