Saturday, October 25, 2025
Happy Diwali

टायटन्स-रॉयल्स यांच्यात क्वालिफायर-१चा सामना

टायटन्स-रॉयल्स यांच्यात क्वालिफायर-१चा सामना

आयपीएल २०२२ चे प्लेऑफ सामने मंगळवारपासून सुरू होत आहेत. यावेळी आयपीएलचा नवा चॅम्पियन मिळू शकतो. कारण, यंदा पहिल्यांदाच जेतेपद पटकावण्याच्या शर्यतीत तीन संघ आहेत. यापैकी गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांनी पदार्पण केले असून पहिल्याच वर्षी धडाकेबाज कामगिरी करत प्लेऑफचे तिकीट पटकावले आहे. तिसरा संघ, बंगळूरुने तीनदा (२००९, २०११ आणि २०१६) अंतिम सामना खेळला आहे. मात्र तिन्ही प्रसंगी विजेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली आहे. पण यावेळी त्यांना चॅम्पियन बनण्याची संधी आहे.

कोलकाता (वृत्तसंस्था) : आयपीएल २०२२ च्या बाद फेरीला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. बहुचर्चित क्वालिफायर-१ मध्ये गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. टायटन्स आणि रॉयल्स यांच्यात खेळल्या जाणाऱ्या क्वालिफायर-१ चा विजेता थेट अंतिम फेरीत जाईल. यानंतर या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला एलिमिनेटरच्या विजेत्याशी खेळावे लागेल. अशा स्थितीत कोणताही धोका न पत्करता दोन्ही संघांना अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणारी ही लढत अतिशय रोमांचक असेल.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने टी-२० लीगच्या पहिल्या सत्रात अप्रतिम कामगिरी करत २० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. त्याचबरोबर संजूच्या नेतृत्वाखालील रॉयल्सची कामगिरीही चांगली राहीली आहे. संघाने ९ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची गोलंदाजी आणि फलंदाजी आतापर्यंत उत्कृष्ट आहे. गुजरात आणि राजस्थान साखळी फेरीत एकदाच आमने-सामने आले आहेत. त्या सामन्यात हार्दिकने (नाबाद ८७ धावा) शानदार कामगिरी करत राजस्थानविरुद्ध संघाला विजय मिळवून दिला होता; परंतु गेल्या ५ सामन्यांत गुजरात आणि राजस्थानच्या संघाला केवळ २ सामने जिंकता आले आहेत. म्हणजेच दोघांमध्ये रंजक लढत पाहायला मिळणार आहे.

गुजरातकडून हार्दिक आणि शुभमन या दोघांनी ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. मात्र, गेल्या २ सामन्यांमध्ये गिल अपयशी ठरला आहे. त्याचबरोबर वृद्धिमान साहाने ९ सामन्यांत ३ अर्धशतके झळकावून स्वतःला सिद्ध केले आहे. डेव्हिड मिलरने ५४ च्या सरासरीने ३८१ धावा केल्या आहेत. खालच्या फळीमध्ये राहुल तेवतिया आणि राशिद खान यांनी मॅच विनिंग कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने १८, लेगस्पिनर राशिद खानने गोलंदाज म्हणून १८ विकेट घेतल्या आहेत.

दुसरीकडे, राजस्थानला आयपीएलमध्ये सर्वाधिक ६२९ धावा करणाऱ्या जोस बटलरकडून खूप आशा आहेत. मात्र गेल्या ५ सामन्यांत त्याला अर्धशतक झळकावता आले नाही. गत ३ सामन्यांत तर तो एकदाही दुहेरी आकडा गाठू शकलेला नाही. कर्णधार संजू सॅमसन, पडिक्कल, जयस्वाल, आर अश्विन आणि हेटमायर यांनीही फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. राजस्थानची गोलंदाजी ही त्यांची मजबूत बाजू आहे. लेगस्पिनर चहलने चालू मोसमात सर्वाधिक २६ विकेट्स घेतल्या आहेत. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने १५, ट्रेंट बोल्टने १३ आणि ऑफस्पिनर आर अश्विनने ११ विकेट्स घेतल्या आहेत.

या सामन्यात हवामान सर्वात महत्त्वाची भूमिका बजावेल. कारण, कोलकातामधील या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास गुजरातला अंतिम फेरीत प्रवेश दिला जाईल. ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. त्यामुळे मोठ्या धावसंख्येच्या सामन्याची अपेक्षा केली जाऊ शकते. मोसमातील आतापर्यंतच्या दोन्ही फ्रँचायझींच्या कामगिरीनुसार हार्दिकच्या गुजरातचे पारडे जड वाटते आहे. कारण, या मोसमात हार्दिक पंड्याचा संघ राजस्थानपेक्षा अधिक संतुलित दिसत आहे. पण तरीही प्लेऑफच्या मोठ्या मंचावर कोण कोणाला हरवणार, याचे उत्तर मंगळवारच्या सामन्यानंतर कळेलच.

ठिकाण : ईडन गार्डन्स, कोलकाता, वेळ : ७.३० वाजता.

Comments
Add Comment