
पुणे (हिं.स.) : पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शहरातील दापोडी परिसरातून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. जुनैद मोहम्मद असे या आरोपीचे नाव असून काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून फंडींग झाल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार जुनैद काश्मीरमधील गझवाते-अल-हिंद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता. याबाबत माहिती मिळाल्यावर पुणे दहशतवादविरोधी पथकाकडून त्याला अटक करण्यात आली आहे. जुनैदला मंगळवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित म्हणून आढळल्यावर सोमवारी दुपारपासून जुनैदची चौकशी चालू होती. चौकशीत दोषी आढळून आल्यावर त्याचावर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
जुनैद मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी आहे. तो मागील दीड वर्षांपासून पुण्यात राहत होता. मदरशामध्ये त्याचे शिक्षण झाले असून लष्कर-ए-तोय्यबाशी देखील त्याचे संबंध असल्याचे चौकशीत पुढे आले आहे.