Saturday, May 10, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

नवाबचे दाऊदशी, तर उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध

नवाबचे दाऊदशी, तर उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंधित व्यक्तींशी संबंध तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे कसाबशी संबंध असल्याचा, खळबळजनक आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत हा गंभीर आरोप केला आहे.


पाकिस्तानातून आलेल्या कसाबशी झुंज देताना, पोलीस अधिकारी हेमंत करकरेंचा मृत्यू झाला होता. कसाबने तर गोळ्या घातल्याच, पण करकरेंनी जे बुलेटप्रुफ जॅकेट घातले होते. ते बोगस होते. बिमल अग्रवाल यांच्या कंपनीने हे जॅकेट पुरवले होते. याच बिमल अग्रवाल यांच्याशी श्रीधर पाटणकरांचे व्यावसायिक संबंध असून, पाटणकर हे उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि परिवाराचे व्यावसायिक संबंध असलेल्यांनी हेमंत करकरेंची हत्या केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.


महाराष्ट्राची जनता विचारत आहे, सांगा ठाकरे पार्टनर कोणाकोणाचे? पुढचे एपीसोड मी हळूहळू महाराष्ट्रासमोर मांडणार आहे. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, उद्धव ठाकरे, श्रीधर पाटणकर, हे लोक कोणाकोणाचे पार्टनर आहेत? ते लवकरच मी महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे. ठाकरे यशवंत जाधवचे पार्टनर की नंदकिशोर चतुर्वेदी हवाला एन्ट्री ऑपरेटरचे आहेत, असे सोमय्या यावेळी म्हणाले.


किरीट सोमय्या म्हणाले, “मी फार जबाबदारीने जाणीवपूर्वक सांगतोय की नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गँगपर्यंत पोहचू शकतात, तर उद्धव ठाकरे यांच्या भागिदारांचे संबंध कसाबपर्यंत आहेत. त्यांचे संबंध कसाबचं कटकारस्थान करणाऱ्या लोकांपर्यंत आहेत. उद्धव ठाकरे, ठाकरे परिवार यांच्याशी व्यावसायिक संबंध असणाऱ्यांचा संबंध हेमंत करकरे यांची हत्या करणाऱ्यांशी आहे.”


“हेमंत करकरे यांचा मृत्यू बुलेट प्रुफ जॅकेट नकली असल्याने झाला. त्या बुलेटप्रुफ जॅकेटचा पुरवठा विमल अग्रवाल याने केला होता. त्याची चौकशी झाली, कमिट्या नेमल्या गेल्या. विमल अग्रवालला अटक झाली,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.


“ज्या विमल अग्रवालला बोगस बुलेटप्रुफ जॅकेटप्रकरणी अटक झाली त्याचं नाव यशवंत जाधववर धाडी टाकल्या तेव्हा पुढे आलं होतं. यशवंत जाधव उद्धव ठाकरे यांचे ‘उजवे हात’ आहेत. जाधवांनी एक हजार कोटी रुपयांची माया जमवली आहे,” असाही आरोप सोमय्या यांनी केला.

Comments
Add Comment