Friday, August 15, 2025

मंकीपॉक्सचा धोका मुंबई पालिका सतर्क!

मंकीपॉक्सचा धोका मुंबई पालिका सतर्क!

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी मंकीपॉक्स या आजाराने भीती वाढली आहे. आफ्रिकन देशांसोबत युरोपातही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत अजूनही मंकीपॉक्सचा रुग्ण आढळलेला नाही, मात्र तरीही मुंबई महापालिकेने उपाययोजना करायला सुरुवात केली आहे.

मुंबई महापालिकेने शहरातील सर्व रुग्णालयांना याबाबत सतर्क केले आहे. रुग्णांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळल्यास संशयित रुग्णाला त्वरित कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात यावे अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या देशात मंकीपॉक्सचे रुग्ण आढळलेले आहेत अशा देशातून भारतात परतलेल्या देशातील प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे.

कस्तुरबा रुग्णालयात मंकीपॉक्स संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष महापालिकेने तयार केला आहे. संशयित रुग्ण आढळल्यास त्याचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.

दरम्यान नागरिकांनी याबाबत काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. मंकीपॉक्समुळे मृत्यू होण्याचे प्रमाण ११ टक्क्यांपर्यंत आहे. लहान मुलांना सर्वाधिक मृत्यूचा धोका आहे. या आजारात ताप, डोकेदुखी, पाठ आणि मांसपेशींमध्ये वेदना होतात. त्याचबरोबर थकवा जाणवतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या चेहरा आणि अंगावर मोठे फोड येतात. काही रुग्णांच्या डोळ्यांवरही याचा परीणाम जाणवतो.

शनिवारपर्यंत जगभरातील १२ देशात एकूण ९२ मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. तसेच इतर २८ संशयित रुग्ण रुग्णालयाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा