Wednesday, July 24, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेस्मार्ट सिटीअंतर्गत येणारा आयटीएस प्रकल्प गुंडाळणार!

स्मार्ट सिटीअंतर्गत येणारा आयटीएस प्रकल्प गुंडाळणार!

  • २ कोटी ६५ लाखांचा झाला होता घोटाळा
  • पाठपुरावा करूनही प्रशासनाची कारवाईबाबत उदासीनता

ठाणे (प्रतिनिधी) : सहा वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेचा टीएमटीअंतर्गत असलेला आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा देणारा तसेच पालिकेच्या स्मार्ट सिटीमध्ये असलेला आयटीएस (इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम) प्रकल्प अखेर गुंडाळण्याच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे.

या प्रकल्पामध्ये तब्बल २ कोटी ६५ लाखांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर अखेर पालिका हा प्रकल्प सुरू करण्याच्या मनस्थितीत नसून घोटाळ्यातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे जनहित विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे. ठाण्यात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात येणारा इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम हा प्रकल्प गेले कित्येक वर्ष बंद स्थितीत होता. अखेर या प्रकल्पाला पालिकेकडूनच टाळे लावले जात आहे.

सहा वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे काम महानगरपालिकेच्या वतीने केपीएमजी अॅडव्हायझरी सर्विसेस या कंपनीला देण्यात आले होते. पण गेल्या सहा वर्षांमध्ये या कंपनीच्या वतीने अजून प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला नाही. तो अपूर्ण स्थितीत आहे. तसेच प्रकल्पामध्ये खोटे काम झाल्याचे भासवूून महानगरपालिकेच्या अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून घोटाळा केल्याचा आरोप महिंद्रकर यांनी केला आहे.

दरम्यान या प्रकल्पात प्रत्येक टप्प्यात भ्रष्टाचार होऊनसुद्धा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची ठेकेदारावर कारवाई केली नाही. त्याला फक्त पाठीशी घालण्याचे काम महानगरपालिकेचे अधिकारी करत आहेत. प्रकल्पामध्ये २६ लाखांचे एलसीडी टीव्ही चोरीला गेल्याचे ठेकेदारांनी सांगूनसुद्धा पालिका अधिकाऱ्यांनी साधी टीव्हीच्या चोरीची चौकशी देखील केली नाही किंवा ठेकेदाराला टीव्ही चोरीला गेल्याची रितसर पोलीस तक्रार दाखल केली आहे का? याबद्दल विचारणाही केलेली नाही.

गेले कित्येक महिने या प्रकल्पाच्या घोटाळ्याच्या बाबतीत महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पाठपुरावा करूनसुद्धा फक्त उडवा-उडवीची उत्तर देण्यात येत आहेत. या भ्रष्टाचारासंबंधी पोलीस चौकशी व्हावी, म्हणून पत्रव्यवहार केला असून या चौकशीच्या अानुषंगाने अधिकाऱ्यांचे जाब नोंदवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. मात्र अद्यापही कोणतीच कारवाई झालेली नसल्यामुळे पालिकेने भ्रष्टाचार करून अखेर हा प्रकल्प गुंडाळण्याच्या स्थितीत आहे. – स्वप्नील महिंद्रकर, शहराध्यक्ष, मनसे जनहित विधी विभाग

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -