
जकार्ता (वृत्तसंस्था) : आशिया कप हॉकी स्पर्धेला सोमवारी इंडोनेशियातील जकार्ता येथे प्रारंभ झाला. क्रीडा विश्वाचे लक्ष लागून राहिलेला भारत-पाक लढत अखेर १-१ अशी बरोबरीत सुटली. पदार्पणवीर सेलवमने एकमेव गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानने ५९व्या मिनिटाला गोल डागत सामना १-१ असा बरोबरीत आणला.
आठव्या मिनिटाला भारताने घेतलेली आघाडी पुढील ५० मिनिटे टिकून राहिली होती, परंतु पाकिस्तानकडून अखेरच्या मिनिटाला बरोबरीचा गोल झाला. पहिल्या क्वार्टरच्या सुरुवातीच्या पाच मिनिटांत दोन्ही संघांना २-२ पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु गोल करण्यात दोघंही अपयशी ठरले. भारतीय संघात बऱ्याच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. ज्युनियर वर्ल्ड कप विजेत्या संघातील १० खेळाडू या स्पर्धेतून सीनियर संघात पदार्पण करत आहेत. पाकिस्तानविरुद्ध या नव्या दमाच्या भारतीय संघाने सुरुवात चांगली केली आणि चेंडूवर ताबा राखताना पाकिस्तानला बॅकफूटवर ठेवले. ८व्या मिनिटाला सेलवम कार्थीने पेनल्टी कॉर्नवर गोल करत दणक्यात पदार्पण केले.
भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये १-० ही आघाडी कायम राखली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानकडून पहिल्याच मिनिटाला आक्रमण झाले. पाकिस्तानी खेळाडू चेंडू सर्कलमध्ये घेऊन पोहोचले होते, परंतु अखेरच्या क्षणाला त्यांना रोखले गेले. पाकिस्तानचा संघ चेंडूवर ताबा राखून सावध खेळावर भर देताना दिसला. त्यांच्या या रणनीतीला भारतीय खेळाडूंनी लाँग पास देऊन उत्तर देण्याचा प्रयत्न केला. २०व्या मिनिटाला पाकिस्तानच्या खेळाडूंनी बरोबरीचा गोल केलाच होता, परंतु गोलरक्षक सुरज करकेरा आडवा आला. त्यानंतरही अफराजला गोल करण्याची संधी होती, परंतु त्याने मारलेला चेंडू गोलपोस्टवरून गेला. ५८व्या मिनिटाला अब्दुल राणाने गोल केला. हा सामना १-१असा बरोबरीत सुटला.