शिबानी जोशी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेची ओळख आपण मागे करून घेतली होती; परंतु त्यांच्या एका आगळ्यावेगळ्या स्तुत्य उपक्रमाची माहिती आजच्या लेखात देत आहे, कारण गणेश उत्सव आता तीन महिन्यांवर येऊन ठेपला आहे आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करायचा असेल, तर या उपक्रमाची खरोखरच गरज आहे. महाराष्ट्रात सर्वत्र गणेशउत्सव अतिशय धामधुमीत साजरा होतो. करोडोंची उलाढाल होते. कोकणामध्ये गणपती उत्सवाचे खास महत्त्व आहे. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ८० हजार गणेशमूर्तींचे पूजन होते.
गणपती हा ज्ञान, विज्ञान आणि निसर्गाची देवता आहे. आपली भारतीय संस्कृती ही एकांगी विचार करत नाही. आपण चराचरामध्ये देव मानलेला आहे. त्यामुळेच निसर्गाला अनुरूप, असे सर्व सण आपण साजरे करतो. म्हणजे वटपौर्णिमेला वृक्षपूजा, नागपंचमीला नाग पूजा, नारळी पौर्णिमेला समुद्राला वंदन असे निसर्गाला अनुकूल सर्व सण साजरे करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यानिमित्ताने आपण निसर्गाच्या जवळ येतो आणि निसर्ग व चराचराचे आपल्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित होते. त्याचप्रमाणे आपला गणेश पूजनाचा उत्सवही आषाढ महिन्यात आपण साजरा करतो. त्यासाठी श्री गणेशाची मातीची मूर्ती इतके वर्षे आपण पुजत होतो; परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बाजारात आल्या.
सुबक, हलक्या, श्रम वाचवणाऱ्या आणि कारागिरांना थोडा अधिक नफा असल्यामुळे त्याचा प्रचार खूप झाला; परंतु विसर्जनानंतर विघटन होत नसल्यामुळे त्याचे तोटेही लक्षात येऊ लागले. कोर्टापर्यंत विषय गेला. त्यानंतर काहीजणांनी कागदाच्या लगद्याच्या ही मूर्ती बनवायला सुरुवात केली. पुन्हा एकदा शाडूच्या मूर्तीवर भर देण्यात आला; परंतु शाडूच्या माती देण्यासाठी सुद्धा अडचणी येतातच. त्यापेक्षाही सहज उपलब्ध होणारा आणि पुनर्वापर होणारा कच्चामाल मूर्तींसाठी वापरण्याची गरज लक्षात येऊ लागली. पीओपी मूर्ती पर्यावरणपूरक नसल्याचे लक्षात आले. विसर्जनानंतर या मूर्तीमुळे पाण्याचे साठे दूषित होतात, जलचरांवर सोबतच माणसांवरही त्याचे दूरगामी परिणाम होतात आणि पर्यावरणाची हानी होते हे लक्षात आले; परंतु नुसताच विरोध करून चालत नाही, तर त्याला सक्षम पर्याय दिल्यास तो पर्याय लोक स्वेच्छेने स्वीकारतात, असे नेहमीच दिसून आले आहे.
हे करू नका, ते करू नका असे सांगण्यापेक्षा लोकांना पर्याय दिला, तर ते निश्चितपणे वापरून पहातात. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानने या विषयावर अभ्यास करायला सुरुवात केली आणि विघटनशील मूर्तींसाठी प्रयत्न सुरू केला. त्यावर काही संशोधन आणि प्रयोगही केले आणि कुडाळ येथील विलास मळगावकर सरांनी दोन-तीन वर्षे मेहनत घेऊन सुबक अशा गोमय गणेश मूर्ती तयार केल्या. या मूर्तींसाठी देशी गाईंचे शेण आणि शेतातील माती यांचे मिश्रण करून त्यांनी मूर्ती घडवायला सुरुवात केली. ज्ञान, विज्ञान आणि तंत्र याचा वापर करून अतिशय सुबक, हलकी, आकर्षक, पर्यावरण पूरक अशी ही मूर्ती आहे. पीओपी मूर्ती जेव्हापासून स्थानिक बाजारात आल्या तेव्हा हेही लक्षात आले की, इथल्या कारागिरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकेल. त्याचप्रमाणे इथली स्थानिक मूर्तीकलाही लोप होऊ शकेल.
कोकणातील एका गणपतीची शाळा साधारणपणे सात ते आठ लोकांना तीन महिन्यांचा रोजगार देते म्हणजेच या गणपती मूर्ती कोकणात शंभर दिवसांचा रोजगार देतात. त्यामुळे पीओपीच्या मूर्ती पेण किंवा इतर ठिकाणाहून जिल्ह्यात आल्या तरी इथल्या कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळू शकते. त्यामुळेच सिंधुदुर्गातील मूर्तिकार संघटनेचे प्रमुख मळगावकर सर यांनी यावरचा उपाय शोधून काढला. आजही गावातील घराघरात एखादं तरी गुरढोर असतं. गाईला आपल्या संस्कृतीत पवित्र स्थान आहे त्यामुळे गाईचं शेण आणि स्थानिक माती असा कच्चामाल सहज, मुबलक उपलब्ध होतो. याचं मिश्रण करून इको फ्रेंडली मूर्तीचा स्टँडर्ड फॉर्म्युला मळगावकर सरांनी तयार केला. गावागावांतील मूर्तिकारांनी आर्थिक आणि पर्यावरणीय महत्त्व समजून घेतलं, तर या मूर्तींचा प्रसार, प्रचार होऊ शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० हजार गणेशमूर्ती बनवल्या जातात आणि गणपतीत जवळपास दोनशे कोटी रुपयांची उलाढाल होते. या सर्व मूर्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातच बनवल्या गेल्या, तर इथल अर्थकारणही बदलू शकेल.
ज्याप्रमाणे आज पेणमध्ये गणेशमूर्तींची मोठी इंडस्ट्री तयार झाली आहे. तसे प्रत्येकाने मनापासून आणि एकमताने अशा प्रकारचे गणपती बनवण्याचे मनावर घेतले, तर सिंधुदुर्गमध्ये अशा प्रकारची इंडस्ट्री उभी राहायला काहीच हरकत नाही, असा विचारही यामागे आहे. जिल्ह्याबरोबरच इतरही ठिकाणी या मूर्ती ठेवल्या जाऊ शकतात. त्यासाठी भगीरथ प्रतिष्ठानने या मूर्तींची ऑनलाइन खरेदी-विक्रीची व्यवस्थाही केली आहे. या मूर्तीच्या पॅकिंगसाठीसुद्धा बॉक्समध्ये थर्माकोल, कागद न घालता कोकोपीटचा वापर करण्यात आला आहे. कोकोपीट ही इको फ्रेंडली आहे. त्यामुळे या गोमय मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी एक कुंडी घेतली आणि त्यात मूर्ती ठेवून तिचं विसर्जन केलं, तर ती दहा मिनिटांत विरघळते. त्यात हे कोकोपीट घातलं, तर या संपूर्ण मातीच्या लगद्यामध्ये आपण कोणतेही झाड लावू शकतो. आता कोणालाही वाटेल की, या मूर्ती तयार कशा करायच्या, तर त्याचा विचारही भगीरथ प्रतिष्ठान केला आहे. या मूर्ती तयार करण्यासाठीचे प्रशिक्षण वर्गही आयोजित केले जात आहेत.
माती कशी तयार करायची?, साचा कसा बनवायचा?, रंग कसे द्यायचे? याचे प्रशिक्षण या वर्गामध्ये दिले जाते. त्या शिवाय जर कोणाला इथून न रंगवलेल्या कच्चा मूर्ती घेऊन जायच्या असतील आणि आपल्या शहरात जाऊन त्या रंगवून त्याची विक्री करायची असेल, तर तशीही सोय भगीरथ प्रतिष्ठानने केली आहे.
अनेक ठिकाणचे कारागीर पेणसारख्या ठिकाणाहून कच्च्या गणेशाच्या मूर्ती घेऊन जातात आणि आपल्या स्थानिक ठिकाणी रंगवून त्याची विक्री करतात. अशा कारागिरांना हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. म्हणूनच लोकांना पर्याय हवा असतो. तो दिला, तर ते निश्चितच स्वीकारतात. त्यामुळेच गोमय गणपतीने घराघराबरोबर लोकांच्या हृदयातही स्थान मिळवलं, तर याचा प्रसार सर्वदूर व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठीचा संपर्क क्रमांक – ९२८४५१५९११.