मुंबई (वार्ताहर) : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून फक्त शिक्षक असलेलाच व्यक्ती उमेदवार असावा, अशी शिफारस महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविले आहे.
अकोल्यातील विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ञ सदस्य प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केला होता. यासाठी त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. डॉ. खडक्कार यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य निवडणूक आयोगाने या बदलाची शिफारस नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. ही शिफारस मान्य झाल्यास शिक्षक मतदारसंघातील संस्थाचालक आणि राजकारण्यांच्या घुसखोरीला चाप बसू शकणार आहे.
राज्याच्या विधान परिषदेत सात शिक्षक मतदारसंघ आहेत. राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून हे सात आमदार निवडून दिले जातात. या निवडणुकीत त्या विभागातील माध्यमिक शिक्षक मतदानाद्वारे आपला आमदार निवडतात. सभागृहात शिक्षकांचे प्रश्न आणि समस्या मांडणे आणि त्याची सोडवणूक करणाची जबाबदारी या आमदारांवर असते. राज्यात सध्या मुंबई, कोकण, पुणे, मराठवाडा, नागपूर, नाशिक आणि अमरावती असे सात शिक्षक मतदारसंघ आहेत. मात्र, अलिकडच्या काळात शिक्षक मतदारसंघ हे संस्थाचालक आणि राजकीय लोकांची राजकीय सोय करण्याचे अड्डे बनल्याची ओरड सातत्याने होत आहे.