मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई लोहमार्ग आयुक्तालयात दररोज ७० ते ८० लाख प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामुळे प्रवासी गर्दीचा फायदा घेऊन बरेच गुन्हे घडत असतात त्यापैकी बहुसंख्य गुन्हे हे मोबाइलचोरीचे असतात. सदर चोरलेले मोबाइल बऱ्याच वेळेस बाहेर राज्यात विकले जातात, असे मोबाइल जप्त करण्यासठी आयुक्तालय स्तरावर दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या, त्यापैकी एक टीम पश्चिम बंगाल व दुसरी टीम उत्तर प्रदेश राज्यात २६ एप्रिल रोजी पाठवण्यात आली होती.
नमूद राज्यातून मुंबईमधून चोरीस गेलेले एकूण ५२ मोबाइल (किंमत अंदाजे ८,१४,१२६/- रु.) तांत्रिक मदत आणि बुद्धिकौशल्य वापरून जप्त करून दोन्ही टीम ५ मे रोजी मुंबईत परतल्या.
सदरची कामगिरी लोहमार्ग पोलीस आयुक्त कैंसर खालिद यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सचिन कदम, पोलीस निरीक्षक अश्रुद्दिन शेख यांच्या मार्गदर्शनानुसार व सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश खाडे व सायबर सेल टीम यांच्या तांत्रिक मदतीच्या सहाय्याने एकूण ०६ अधिकारी आणि २४ अंमलदार यांनी केलेली आहे. या कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.