Thursday, September 18, 2025

पामबीच मार्गावरील उड्डाणपुलाला विविध राजकीय पक्षांकडून विरोध

पामबीच मार्गावरील उड्डाणपुलाला विविध राजकीय पक्षांकडून विरोध

नवी मुंबई (प्रतिनिधी) : वाशी येथील महात्मा फुले टी जंक्शन ते कोपरी सर्कल दरम्यानच्या पामबीच मार्गावरील नियोजित उड्डाणपुलाचे नियोजन असताना या उड्डाणपुलाला विविध कारणांनी मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या विरोधात पर्यावरणप्रेमींबरोबरच बलाढ्य राजकीय पक्ष विरोधात उतरले आहेत. त्यामुळे नियोजित पूल रद्द करण्याविषयी प्रशासकांनी विचार करण्याची गरज भासू लागली आहे. या पुलाला विरोध करण्यामागे या पुलाची काहीही गरज नसल्याचे राजकीय पक्षांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तर दुसरीकडे या पुलाची निर्मिती करताना पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची भीतीदेखील व्यक्त केली जात आहे.

वाशी पामबीच महामार्ग हा वर्दळीचा महामार्ग समजला जातो. या ठिकाणातील रस्त्याच्या बाजूला सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर जर प्रतिबंध आणले गेले, तर वाहतुकीचे प्रश्न, समस्या उद्भवणार नाहीत; परंतु यावर वाहतूक पोलीस व मनपा अतिक्रमण विभागाने कडक धोरण आखले, तर अवैध व्यवसायांना आळा बसेल. पण असे होत नसल्याने वाशीतील एक बाजू व कोपरी सर्कलच्या एका बाजूला अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी एक लेन काबीज केली आहे. यामुळे या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न संभवत आहे; परंतु यावर ३५३ कोटी खर्च करून उड्डाणपूल बांधणी करण्याची गरज नसल्याचे राजकीय पक्षांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे उड्डाणपूल बांधताना ३९० वृक्षांचा बळी जाणार आहे.

हा नियोजित उड्डाणपूल बांधला जाऊ नये. म्हणून पहिल्यांदा प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष दिगंबर राऊत यांनी पहिल्यांदा तीन महिन्यांपूर्वी आयुक्तांना भेटून व निवेदन देऊन विरोध केला होता. तरीसुद्धा उड्डाणपुलाविषयाची कार्यवाही चालूच राहून कार्यादेश देखील संबंधित ठेकेदाराला दिले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील निवेदन दिले आहे; परंतु त्यावर अजूनही कार्यवाही झाली नाही.

मागील आठवड्यात माजी नगरसेविका व माजी तदर्थ पर्यावरण समिती सभापती दिव्या गायकवाड यांनी देखील निवेदन देऊन उड्डाणपुलाला विरोध केला आहे, तर नुकतेच आपचे नवी मुंबई अध्यक्ष शामभाऊ कदम व सचिव सुमित कोटियान यांनीसुद्धा आयुक्तांना निवेदन देऊन विस्तृतपणे उड्डाणपूल का होऊ नये? याची लेखी माहिती आयुक्तांना दिली आहे.

उड्डाणपुलाबाबत वृक्ष प्राधिकरणाकडून कार्यवाही चालू आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. - संजय देसाई, शहर अभियंता, पालिका

Comments
Add Comment