Thursday, October 10, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यपावसाळ्यासाठी मुंबई सज्ज

पावसाळ्यासाठी मुंबई सज्ज

सीमा दाते

दर वर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होत असते आणि म्हणूनच दर वर्षी कोट्यवधी रुपये नालेसफाईसाठी महापालिका खर्च करते. मात्र या वर्षी नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर मुंबई महापालिकेवर प्रशासनाची नियुक्ती केल्यानंतर आधीच नालेसफाईला वेळ झाला आहे. मात्र तरीही ३१ मेपर्यंत मुंबईतील नालेसफाई पूर्ण होणार असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. मात्र तरीही अद्याप २५ ते ३० टक्के नालेसफाई अपूर्ण आहेच. सध्या जर पाहिले, तर मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून भाजपही तेवढीच आक्रमक पाहायला मिळाली आहे. एकीकडे भाजप नालेसफाईचा पाहणी दौरा करत आहे. पालिकेने नालेसफाईची कामे लवकरात लवकर करावी म्हणून भाजप प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे शिवसेनेने नालेसफाई आणि मुंबईतील रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला आहे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबबत पालिकेत बैठक देखील घेतली होती. या बैठकीत ३१ मेपर्यंत सगळी कामे करण्याचा दावा केला आहे.

त्यामुळे साहजिकच मुंबईत यावेळी दर वर्षीसारख्या समस्या नसणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण दोन्हीही पक्ष सध्या मुंबईकरांच्या समस्या वाढू नये. यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आता यात एकमेकांवर आगामी महापालिका निवडणुकीला घेऊन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत ती गोष्ट वेगळी.पण यामुळे तरी या वर्षी मुंबईकरांचा पावसाळा सुखकर होईल का? एकीकडे भाजपने मुंबईतील नालेसफाई केवळ ३५ टक्केच झाली असल्याचा आरोप केला आहे, त्यातच पावसाळ्यापूर्वी करावी लागणारी वृक्ष छाटणी अद्याप झालेली नाही. दरडी कोसळणे, झाडं कोसळणे, मोडकळीस आलेल्या इमारती याबाबतचे नियोजन करण्यात आलेले नाही, तर ही शिवसेनेचे पळकाढू धोरण असल्याची टीका भाजपने केली आहे.

दुसरीकडे मात्र आदित्य ठाकरे पावसाळीपूर्व कामाच्या तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिकेत बैठका, मुंबईतील कामांचा आढावा सुरू आहे. विशेष म्हणजे मुंबईतील दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या डोंगर उतारावरील ठिकाणी उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहे, तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तीन तुकड्या सध्या मुंबईत सतत तैनात असतात. तीन तुकड्यांव्यतिरिक्त यंदाच्या पावसाळ्यादरम्यान राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या आणखी तीन तुकड्या या दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या परिसरांमध्ये यावेळी पहिल्यांदाच तैनात करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या तीन तुकड्या महानगरपालिकेच्या एस विभाग, एम पश्चिम विभाग आणि एन विभाग अशा तीन विभागांमध्ये असणार आहे, तर मुंबईत १३५ जवानांचा समावेश यंदा पावसाळ्यात असणार आहे. इतकेच नाही तर नालेसफाईचे काम निर्धारित वेळापत्रकानुसार ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे रस्ते कामाबाबतही लक्ष घालण्यात आले असून रस्त्याची नियमित पाहणी करणे व रस्त्यांवर होणारे खड्डे भरण्यासाठी महापालिकेने सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये नोडल ऑफिसर नेमण्याचे निर्देशही दिले आहेत,.

याच कामासोबत घनकचरा व्यवस्थापन व सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या झाडांची छाटणी ही शास्त्रोक्त पद्धतीने व सुयोग्य प्रकारे करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळी आजार वाढू नये आणि अस्वच्छता होऊ नये, यासाठी घनकचरा व्यवस्थापनावर लक्ष देण्यात येणार आहे. डेंग्यू, मलेरिया याबाबत उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तर नागरिकांच्या ट्विटर, व्हॉट्सअॅप चॅटबॉट यांसारख्या समाजमाध्यमांचा वापर करून नागरिकांशी समन्वय साधण्याचे निर्देश पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. एकूणच काय तर यंदा पावसाळ्यात समस्या वाढू नये म्हणून पालिकेकडून या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात मुंबईकरांना दर वर्षीप्रमाणे त्रासाला सामोरे जावे लागणार की नाही हे पाहावे लागेल. कारण, दर वर्षीच पालिका अशा अनेक उपाययोजना करते मात्र तरीही या उपाययोजनांचा फायदा होत नाही आणि मुंबईतील अनेक सखल भाग पाण्याखाली जातो, रेल्वे रुळांवर पाणी साचले जाते आणि त्यामुळे मुंबई ठप्प होते. यावेळी तर मुंबई महापालिकेला नवे फ्लडिंग स्पॉट आढळले आहेत. त्यातच हे फ्लडिंग स्पॉट वाढले आहेत. काही वर्षांपूर्वी मुंबईत एकूण २५० फ्लडिंग स्पॉट होते, तर या वर्षी वाढून ३६८ फ्लडिंग स्पॉट आढळले आहेत. महत्त्वाचे म्हणजे २४८ फ्लडिंग स्पॉट हे उपनगरात आहेत आणि १२० हे मुंबई शहारात आहेत. यामुळे पाणी साचण्याचा सर्वाधिक धोका हा उपनगरातील नागरिकांना असणार आहे. एकीकडे वाढलेले फ्लडिंग स्पॉट हे मुंबई महापालिकेसाठी आव्हान असणार आहे, यामुळे या उपाययोजनांचा किती फायदा होतो आणि मुंबईकराच्या किती समस्या दूर होतात? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -