जकार्ता (वृत्तसंस्था) : आशिया कप हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेला सोमवारपासून प्रारंभ होत असून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीने स्पर्धेला सुरूवात होणार आहे.
भारताला स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. यापूर्वी २१ डिसेंबर २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानला ४-३ ने पराभूत केले होते. वीरेंद्र लाकडाच्या अनुपस्थितीत भारतीय संघ विजयी सलामी देण्यासाठी उत्सुक आहे, तर ढाकामधील पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जाईल.
आतापर्यंतच्या आकड्यांवर नजर टाकल्यास पाकिस्तानचा पगडा भारी मानला जात आहे; परंतु या स्पर्धेत किताब जिंकण्यात दोन्ही संघ बरोबरीत आहेत. दोघांनीही तीन-तीन वेळा किताबावर नाव कोरले आहे. भारताने २००३, २००७, २०१७ मध्ये जेतेपदावर नाव कोरले आहे, तर १९८२, १९८५, १९८९, १९९४, २०१३ मध्ये अंतिम सामना गमावला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सोमवारी हॉकीचा १७८वा सामना होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघ १७७ वेळा आमने-सामने आले आहेत. त्यातील भारताने ६४ आणि पाकिस्तानने ८२ सामने जिंकले आहेत. ३१ सामने बरोबरीत सुटले आहेत. आशिया कप स्पर्धेत दोन्ही देश ८ वेळा एकमेकांना भिडले आहेत. त्यातील ३ सामने भारताने, तर ५ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.