Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरसफाळयात रेल्वे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार...

सफाळयात रेल्वे अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार…

  • डीएफसीसीच्या प्रकल्पासाठी नैसर्गिक नालाच फिरवला
  • ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे अधिकारी नरमले

सफाळे (वार्ताहर) : पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाच्या पूर्वेकडील भागातील सांडपाणी व पावसाळी पाण्याचा निचरा पश्चिमेकडील भागात वाहून नेणाऱ्या रेल्वे ब्रीज क्रमांक १०२ मार्गावरील नाल्याची दिशा इरकॉन कंपनीकडून अचानक बदलण्यात आल्याने भीषण स्वरूपाची पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यासंदर्भात, उंबरपाडा-सफाळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी डीएफसीसीच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. संभाव्य परिस्थितीची जाणीव करून मुख्य नाल्याचा मार्ग पूर्ववत करावा तसेच रेल्वे मार्गाखालून सरळ रेषेत पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

पश्चिम रेल्वेमार्फत डेडिकेटेड फ्रँट कॅरिडॉर (डीएफसीसी) व विरार-डहाणू चौपदरीकरण या दोन्ही प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सदर प्रकल्पांचे काम करताना पूर्व व पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात मुरुम मातीने भराव केला आहे. याशिवाय स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांना विश्वासात न घेता रेल्वेचे अधिकारी मनमानी कारभार करून कामकाज करत आहेत. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होणार आहे.

डीएफसीसीने इरकॉन कंपनीला कंत्राट दिले असून नैसर्गिक नाल्यांचे मार्ग बदलणे, बंद करणे असे प्रकार केले जात आहेत. सफाळे बाजारपेठेत दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होते. या पुराचे पाणी रेल्वे ब्रीज क्रमांक १०२ मार्गे पश्चिम भागात वाहून नेले जाते. परंतु या नाल्याचा मार्गच बदलण्यात आला आहे. याबाबत डीएफसीसीचे अधिकारी व्ही. पी. सिंग यांना संतप्त ग्रामस्थांनी जाब विचारत नाल्याचा मार्ग पूर्ववत करण्याबाबत सांगितले. सिंग यांनी ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मक भूमिका दर्शवित नाल्याचा मार्ग पूर्ववत करण्याच्या सूचना इरकॉनला कंपनीला दिल्या.

सोबतच बायपास करून वळविलेला नाला लवकरच रेल्वेच्या खालून सरळ मार्गाने भूमिगत पद्धतीने नियोजन करून करण्याबाबत उंबरपाडा-सफाळे ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी निवेदन देऊन सूचित केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी बाबुराव पाटील, माजी सरपंच अमोद जाधव, वसंत घरत, समीर म्हात्रे, प्रफुल्ल घरत यांच्यासह व्यापारी मंडळ, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -