मुंबई (वार्ताहर) : मुंबईत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने दहा कोविड सेंटर सुरू केले होते. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने दहिसर, नेस्को व कांजूरमार्ग ही तीन जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. या सेंटरमधील आवश्यक साहित्य पालिकेच्या रुग्णालयात हलवले जाणार आहे. यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा देणे शक्य होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली.
मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर १० जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आली. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, गॅस व ऑक्सिजनची पाइपलाइन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, बेड्स आदी साहित्य या कोविड सेंटरमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कोरोना काळात याचा रुग्णांना चांगला फायदा झाला. कोट्यवधी रुपये खर्च करून ही सेंटर उभारण्यात आली आहेत. सध्या कोरोना नियंत्रणात आल्याने तीन कोविड सेंटर बंद केली जाणार असून, याबाबतची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
या सेंटरमधील बेड्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटर आदी साहित्य पालिकेच्या रुग्णालयात वापरले जाणार आहे, तर इतर साहित्य सेव्हन हिल रुग्णालयात साठवले जाणार आहे. पालिकेची नव्याने मोठी रुग्णालये उभारली जाणार आहेत, त्यामध्ये इतर साहित्य वापरले जाणार आहे, अशी माहिती संजीव कुमार यांनी दिली.
तीन कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी पालिका सतर्क आहे. कोरोना डोके वर काढण्याचे आव्हान पाहता उर्वरित सात सेंटर स्टॅण्डबाय मोडवर ठेवण्यात येणार आहेत. कानपूर आयआयटीने स्पष्ट केल्यानुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर जुलै ते ऑगस्टदरम्यान येऊ शकतो. म्हणूनच सप्टेंबरपर्यंत कोविड सेंटर सुरू ठेवणार असल्याचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.