
- केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे आवाहन
- सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सवाचे कणकवलीत शानदार उद्घाटन
संतोष राऊळ
कणकवली : ‘चांगले आणि सुखवस्तू जीवन जगायचे असेल तर उद्योग - व्यवसाय करा. स्वतःचे उद्योग निर्माण करून प्रगती साधण्याचा संकल्प करा. नोकरीच्या मागे लागू नका... तरुण - तरुणींना उद्योजक म्हणून उभे करण्यासाठी माझ्या एम.एस.एम.ई. खात्याच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. फक्त आत्मविश्वासाने पुढे या. कामात चिकाटी ठेवा, जिद्दीने उभे राहा, मी तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करेन’, असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला.
कणकवली येथे ‘एमएसएमई’ आयोजित ‘सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव २०२२’चे शानदार उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राणे म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझा तरुण उद्योजक व्हावा ही माझी इच्छा आहे. उद्योग क्षेत्रात प्रगती अथांग आहे. त्याचा फायदा घ्या. आसाममधून येणारे उद्योजक गवतापासून सेंट आणि विविध अत्तर बनवित आहेत. तर केरळमधील लोक नारळाच्या किशीपासून वस्तू बनतात. त्याचप्रमाणे त्या किशीपासून प्लायवूडसुद्धा बनवतात आणि परदेशात पाठवतात. देशातील सर्वात मोठे उद्योजक धीरूभाई अंबानी हे १५०० रुपयांचे भांडवल घेऊन उद्योग सुरू केला आणि मृत्युसमयी धीरूभाईंची हिच रिलायन्स कंपनी ६३ हजर कोटींची उलाढाल करत होती. त्यांचा आदर्श घ्या आणि प्रगती करा’.
‘यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७२ अधिकारी आणले. २०० कोटींचे आधुनिक टेक्नॉलॉजी असलेले उद्योग प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मी मंजूर केले आहे’, असेही त्यांनी सांगितले. ‘नोकरी हवी मग ती शिपाई पदाची असली तरी चालेल ही मानसिकता सोडा. डाळ, कुळथाची पिठी - भात खाऊन समाधान मानू नका. देशात करोडो रुपयांची उलाढाल होते. त्याच उद्योगक्षेत्रात तुम्ही कधी तरी असणार आहात की नाही?’, असा सवाल यावेळी केंद्रीय मंत्री राणे यांनी युवकांना केला. ‘कोकणी, मराठी माणसाने आत्मविश्वास बाळगावा. तसेच १५ ते २० करोड रुपयांचा आपला उद्योग असावा, अशी जिद्द बाळगावी. आपल्या येथे गरे, आंबा, कोकम ही महत्त्वाची फळे आहेत. त्यावर काय प्रक्रिया करू शकता हे ठरवा. मला छत्रपती शिवाजीराजे यांच्या विचारांतून तयार झालेला माणूस हवा. त्यांचा वारसा सांगता तर नवीन निर्मिती करण्याची क्षमता ठेवा’, असे ते म्हणाले.
‘मी राजकारणात आलो, तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा मागासलेला होता. मात्र येथील माणसाचे दरडोई उत्पादन वाढविले. आज रस्ते, पाणी, वीज अशा सर्व व्यवस्था केल्या. इंजिनीअरिंग कॉलेजे, मेडिकल कॉलेज उभे केले. अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. विरोधकांनी काय केले ते सांगावे, असा सवालही त्यांनी केला. मी केंद्राचा मंत्री आहे. मी कधी जात, धर्म आणि पक्ष पाहिलेला नाही. प्रत्येकाला मदत केली आणि यापुढेही करत राहणार’, असेही केंद्रीय मंत्री राणे यांनी सांगितले.