अनघा निकम-मगदूम
मान्सूनी वाऱ्याने पावसाची चाहूल देण्यास सुरुवात केली आहेच. मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरीसुद्धा कोसळून गेल्या आहेत. त्यामुळे कोकणात पुढचे दोन ते तीन महिने मुसळधार पावसाचे असणार हे नक्की झाले आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, ओसंडून वाहणाऱ्या नदी, ओढे आणि त्यांना कवेत घेत उधाणलेला समुद्र, हे असे वातावरण आता कोकणात दिसायला लागेल. महाराष्ट्रातील कोणत्याही प्रदेशापेक्षा सर्वाधिक पाऊस पडला म्हणून कोकण आपली पाठ थोपटवून घेईल. इतका पाऊस पडेल की, सारे काही ठप्प होईल. पण बरसणारे हे पाणी नदी, ओढ्यामधून वाहून समुद्रात पोहोचेल, डिसेंबरपर्यंत भरलेल्या विहिरी, धरणे, नळ पाणी योजना कॅलेंडरवर जानेवारीचे पान येईपर्यंत कोरड्या होऊ लागतील आणि एप्रिल सरता सरता हे पाणी स्रोत कोरडे होतील आणि मग सर्वाधिक पाऊस पडणारा हा प्रदेश पाणी टंचाईग्रस्त होईल.
हीच परिस्थिती दरवर्षी या भागामध्ये असते. यंदाही आहेच. गेल्यावर्षी कोकणात प्रचंड पाऊस पडला. पण पडला आणि वाहून गेला, कारण कोणी तो साठवला नाही, नदीचा वाहता प्रवाह कोणी अडवला नाही, होरलेल्या नद्यांचा गाळ काढायच्या प्रश्नाकडे कुणी गांभीर्याने पाहिलेच नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील उन्हाळा सुरू झाला की, पाणीटंचाईतून त्याचे चटके पहिल्यांदा जाणवतात ते खेड तालुक्यातील धनगरवाड्याना. उंच डोंगरावर राहणाऱ्या वाड्या-वास्त्यांना हळूहळू ही ‘पाणीबाणी’ दुर्गम गावात पोहोचते. गावातून वाहणारी नदी कोरडीठाक झालेली असते, घराशेजारच्या विहिरींनी तळ गाठलेला असतो, मग पाण्यासाठी लांबचे आजवर टिकलेले पाणवठे शोधले जातात किंवा प्रशासनावर विश्वास ठेवत टँकरवर भिस्त ठेवावी लागते. आजसुद्धा हीच परिस्थिती इथे आहे.
खरंतर केवढा हा विरोधाभास आहे. पाणी नसणारा कोकण हा प्रदेश नाही, उलट निसर्गाने मुक्तहस्ताने आपला कृपाशीर्वाद या प्रदेशाला दिला आहे. इथला माणूस जागृत आहे, शिक्षित आहेत, राजकीयदृष्ट्या सजग आहे. तरीही या २१ व्या शतकात सुद्धा टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ इथल्या अनेक भागावर येते.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माणसे टँकरच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहेत. रत्नागिरी शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील अन्य भागातसुद्धा कमी-जास्त प्रमाणात हीच परिस्थिती आहे.
हे चित्र बदलायला हवे आणि ते बदलणे इथल्याच माणसांच्या हातात आहे, प्रशासनाच्या हातात आहे, इथल्या लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या हातात आहे. हा प्रश्न मूलभूत आहे. पण तरीही त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने जेव्हा निवडणुका असतात तेव्हा उन्हाळा नसतो, त्यामुळे या प्रश्नाचा विषय निवडणूक प्रचारात येत नाही. रस्ते, पाखाड्या या पलीकडे वेगळा विचार करून काम करणारे लोकप्रतिनिधी रत्नागिरीत नाहीत. त्याचा परिणाम अनेकदा अनेक ठिकाणी दिसतो तसाच तो या पाणी प्रश्नाबाबतसुद्धा दिसतो.
वास्तविक सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या कोकणात उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू नये यासाठी शासन स्तरावरून महत्त्वाचा निर्णय घेऊन कालबद्ध कार्यक्रम राबवून हा सहजी सुटणारा प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलणे आवश्यक आहे. या कालबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रशासनानेसुद्धा तितक्याच गांभीर्याने केली पाहिजे आणि असे कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनावर दबाव टाकणे अावश्यक आहे.
पण तसे होत नाही, म्हणूनच अजूनही ही स्थिती कायम आहे. वनराई बंधारे हा यावरचा खूप सोपा उपाय आहे. त्याशिवाय पाणी अडवा, पाणी जिरवा या उपक्रमासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था पुढाकार घेणाऱ्या आहेत. सोशल वर्क म्हणून हिरीरीने भाग घेणारी तरुणाई, महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र त्यांना एक भक्कम पाठिंब्याची, सुरू होणाऱ्या उपक्रमात सातत्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मानसिकतेची आवश्यकता आहे.
पण आजवर यावर फक्त लिहिले जात आहे, त्याची अंमलबजावणी कधी होणार याकडे इथला भूमिपुत्र विशेषतः महिला वर्ग डोळे लावून बसला आहे