डॉ. स्वप्नजा मोहिते
हातात चहाचा कप घेऊन मी घराच्या गॅलरीत बसलेय, समोरचं आभाळ न्याहाळत! गच्चं काळे-कबरे ढग भरून आलेत. आभाळ पंखात भरून घेतलेले ढग! ओसंडून जातील बघता बघता आणि आभाळ रितं, सुनं सुनं होऊन जाईल. असंच आपल्या मनाचं असतं तर? भरून आलेलं मन मोकळं होऊन जावं… परत नव्यानं, नव्या उमेदीनं नवा दिवस पेलण्यासाठी! असं गच्चं आभाळ बघितलं की, मला ती आठवते. माझी मैत्रीण… सखी!
तिची माझी सोबत बालपणापासूनची. बचपन के दिन भुला ना देना… अशा आठवणींची! आई तर आम्हाला सखी पार्वतीच म्हणायची. हसरी, खेळकर ती तर थोडी अबोल, आपल्यातच गुमसुम असणारी मी! अपोझिट पोल्स अट्रॅक्ट… तसंच काहीसं झालं असावं आमचं. पण तिची माझी जीवाभावाची मैत्री जुळली खरी! एक वेगळच नातं होतं आमचं! ती तशी मनस्वी, जीव ओतून प्रेम करणारी, हळवी आणि रोमँटिकही! कविता लिहायची! नातं असं जुळावं… रंग मनातले ही उतरावे… अथांग आभाळाचे… अर्थ त्यात गवसावे!! असं खोल अर्थाचं काही लिहीत राहायची ती! तिचे शब्द वाचले की, तिचे हात हातात घेऊन मी नुसती बसून राहायचे. काय बोलू? कळायचंच नाही मला तेव्हा!
हळव्या ओल्या पावसाची, गोष्ट आता सुरू झाली.
भिजलेल्या वाटेवरची, रात्र हवीशी सुरू झाली…
स्वप्न रंगले नभाचे, कूस जागली मातीची,
पाना-पानांवर आता, गोष्ट पावसाची रंगली!
पाऊस अतिशय आवडायचा तिला! तिची डायरी अशा ओल्या हळव्या कवितांनी भरून जायची. मला कधी कधी तिची खूप काळजी वाटायची. कसं व्हायचं हिचं? एवढं हळवं असून कसं चालेल? पण ती खूश असायची. तिचं असं आनंदात, आपल्याच रंगात जगणं, मला ही भिडत जायचं मग!
ती त्याच्या प्रेमात पडली तेही शेअर केलंच तिनं माझ्याशी! तिच्या प्रत्येक गोष्टीची साक्षीदार मीच असायचे ना! त्याला कविता कळत नव्हती… तो रंगात बुडून जाणाराही नव्हता. पण तरीही तो आवडला होता तिला. “माहीत नाही गं… पण तो वेगळाच आहे… त्याला दाखवता येत नाहीत भावना, त्याला नाही जमत ते! पण त्याला मी समजते, माझ्यातली उत्कटता, माझं हे आयुष्याला समजावून घेणं, त्याला उमजतं. ही इज जस्ट परफेक्ट फॉर मी!” ती म्हणायची. मी त्याच्यातलं ते तिच्यासाठीचं परफेक्ट असणं शोधत राहायचे. मला ते कधीच सापडायचं नाही. पण तो तिचा, म्हणून मी त्याला आमच्या नात्यातला तिसरा कोन म्हणून स्वीकारत राहायचे. तिचं त्याच्यात गुंतत जाणं पाहत राहायचे.
काहीतरी खटकायचं मला या नात्यात. पण नक्की बोट ठेवता येत नव्हतं या खटकण्यावर. समथिंग वॉज मिसिंग देअर! त्यांचं नातं फुलत गेलं आणि मी थोडी दूरच झाले तिच्यापासून. कदाचित तो असल्याने जाणवलं नसेल तिला माझं हे असं दूर जाणं! पण तरीही आम्ही जीवाभावाच्या मैत्रिणी होतोच. जणू काही शरीरं वेगळी पण मनं जुळलेली… घट्ट! तिच्या सगळ्या गोष्टी, गुपितं शेअर करण्याचं हक्काचं ठिकाण मी होतेच नं! “तू आणि तो… माझी खूप खूप जवळची, माझी हक्काची माणसं आहात!” ती भेटली की, माझ्या गळ्यात पडत म्हणायची. हल्ली तू कविता करत नाहीस का? खास कविता लिहिण्यासाठी दिलेल्या वह्या कोऱ्याच पडलेल्या बघून मी विचारलंच तिला एकदा. खूप दिवसांनी मी तिच्या घरी गेले होते तेव्हा.
खिडकीतल्या मलूल पडलेल्या झाडाला पाणी घालता घालता, मी खोलीभर नजर फिरवली. कोपऱ्यातल्या ईझलवर अर्धवट रंगवलेलं एक पेंटिंग, बाजूच्या टेबलवर सुकलेले रंग आणि धूळ भरलेलं पॅलेट! एकदा का चित्र रंगवायला घेतलं की, जेवणाची ही शुद्ध नसायची हिला! ही इतकी कुठे हरवली?
नाही गं! वेळच मिळत नाही हल्ली! माझ्या डोळ्यांतली प्रश्नचिन्हं वाचत ती बोलली. मला, कविता लिहायचा मूड आला की, मिळेल तिथे आणि मिळेल त्या कागदावर कविता लिहिणारी ती आठवली. कविता आणि रंग म्हणजे जीव की प्राण असलेली ती हीच का? मी तिच्या डोळ्यांत माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधतेय की त्याला कविता समजत नाही म्हणून हीच कवितांपासून दूर जातेय? त्याच्या जगात रंगांना स्थान नाही म्हणून हीच विसरतेय रंगांना? माझ्या विचारांनी मीच दचकले. माय गॉड! हे असं व्हायला नकोय! ‘अर्थ काही नवे, कळू लागले आता… माझी मला मीच उमजू लागले आता… शब्द कोंडलेले मनातले वेडे… भाषा नवी कोणती, कळू लागली आता!’ मध्येच केव्हातरी तिनं मला ही कविता पाठवली आणि मी तिच्या ओळींमधले अर्थ शोधत बसले. एक अनामिक हुरहूर, का कळेना… मनात जागी झाली.
ही हरवतेय का कुठेतरी? तिचे कॅनव्हास… रंग… पॅलेट्स… कवितांच्या वह्या, तिच्या खोलीत कोपऱ्यात पडलेल्या… एकट्या… अस्पर्शशा! इतकी ही त्याच्या जगात गुंतून गेलेली! मग तो का नाही रंगला हिच्या रंगात? हिच्या कवितांमधले शब्द का नाही उतरले त्याच्या मनात? मला त्याला विचारावंस वाटायचं. पण तो तसाच दूरस्थ… अलिप्त… आपलंच जग पांघरून घेतलेला! कशी पडली ही त्याच्या प्रेमात? मी अजून शोधतेय याचं उत्तर! पण तरीही… मी तिच्याबरोबर होते. तिच्या निर्णयात… तिनं रंगवलेल्या तिच्या आयुष्याच्या स्वप्नात! तिचं ते छोटंसं जग होतं… त्याचं, तिचं आणि थोडंसं माझंही! आय वॉज अ पार्ट ऑफ हर वर्ल्ड! घरच्यांच्या विरोधात जाऊन, तिचं आणि त्याचं लग्न झालं… माझ्याच साक्षीनं! लग्नाच्या आधीच्या रात्री मी खूप बोलले तिच्याशी… तिच्या कविता, तिची पेंटिंग्ज… तिच्यातली ती उत्कटता… ‘लाइफ इज सनशाइन’ म्हणत रोज नव्या नजरेनं जगाकडे बघत जगत जाणं… मीच बोलत होते… फारसं कधी न बोलणारी मी. मी शोधत होते माझ्या त्या मैत्रिणीला! ती ऐकत होती… बाहेरच्या काळोख माखल्या आकाशातल्या चांदण्या मोजत! “तू नं खूप वेडी आहेस… मी इथेच आहे की… ही काय तुझ्यासमोर!” माझे हात हातात घेऊन, आपल्या गालांवर ठेवत ती म्हणाली. तिच्या डोळ्यांत चंद्राचं चांदणं भरास आलेलं तेव्हा. कोर्टात तिचं लग्न लागलं आणि मी घरी येऊन खूप रडले त्या दिवशी… एकटीच! तिच्यासमोर हसरा चेहरा ठेवून वावरतानाही आतल्या आत मी रडतच होते. हे कुठलं फिलिंग?
माझं मलाच कळत नव्हतं. ती हरवलीय… इतकंच खोलवर जाणवलं मला! हिरव्या चंदेरी शालूत ती खूप गोड दिसत होती. एखाद्या राजकुमारीसारखी! न राहून मी तिच्या हनुवटीवर काजळाचा काळा ठिपका लावलाच. माझीच दृष्ट लागायची हिला! मनातले कढ दाबत, मी हसण्याचं नाटक करत राहिले… आणि करत राहिले सोंग… खूप खूश असल्याचं!
दिवस सरत गेले… मी माझ्या विश्वात… ती तिच्या जगात!
तिची एक कविता माझ्यापर्यंत आली आणि मी परत अनुभवली तीच हुरहूर. कशी आहेस? ये नं माझ्याकडे… दोन दिवस तरी! मी किती विनवलं तिला. पण ना ती आली, ना तिची नवी कविता! न राहवून मीच गेले तिच्याकडे! मला बघून ती हसली, गळ्यात पडली नेहमीसारखी!
पण तिच्या हसण्यात ती नव्हतीच कुठे! “कुठे हरवलीस गं? ना मुलाकात, ना कविता, ना कोई पेंटिंग… इतनी खामोशी क्यूँ?” मी तिला हलवत विचारलं. “नव्या विश्वात भरकटले गं! प्रेम आपल्याला कुठे नेऊन ठेवतं नं? मला वाटलं होतं… आमचं एक सुंदरसं जग असेल… दोघांचंच! पण तो माझ्या विश्वात कधी आलाच नाही गं! तो तिथेच राहिला… मीच हरवले… भरकटले तुटल्या पतंगागत!” तिच्या शब्दांचे घाव माझ्या मनावर खोलवर उमटत राहिले. याचीच भीती वाटत होती का मला? अदृष्टातील दृष्ट काहीतरी दिसलं होतं का मला? तिला मिठीत घेत, मी नुसतीच थोपटत राहिले तिला. तिच्या डोळ्यांतली आसवं थांबवण्याची ताकद नव्हतीच माझ्यात. तो आता दुसऱ्याच कुणात गुंतला होता. असं कसं होऊ शकतं? ती मला परत परत विचारत होती. काय उत्तर देऊ हिला? हिच्यावर प्रेम केलं ना त्यानं? लग्न केलं… ही घरच्यांशी भांडली, त्याची बाजू मांडत राहिली आणि हा? असा? त्याचं ते दुसरी कोणीतरी शोधणं… तिच्यात गुंतणं… कसं समजलं असेल हिला? की त्यानेच सांगितलं? कसा सहन केला असेल हा धक्का… हा विश्वासघात हिनं?
मला शब्दच सुचत नव्हते. एखाद्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास टाकावा आणि त्यानंच खड्ड्यात ढकलावं तसंच झालंय! त्याला समोर उभं करून जाब विचारावा का? पण आता काय उपयोग त्याचा? नात्यातला विश्वास हरवल्यानंतर तो कसा मिळेल परत? तडा गेलेली काच अशी सांधते का परत? नो वे!! ती भकास डोळ्यांनी बघतेय माझ्याकडे. काय सांगू तिला? घरच्यांशी त्याच्यासाठी भांडलेय, त्यांना सोडून आलेय… आता परतही फिरता येत नाहीये. त्याला दुसरी कोणी आवडलीय म्हणून त्याला बांधूनही ठेवता येत नाहीये. काय नातं झालंय गं माझं विचित्र? काय करू? तिच्या शब्दांतली वेदना अस्वथ करत जातेय. कसा सोडवू हा पीळ? या गोष्टी कथा-कादंबऱ्यांमध्येच घडतात ना? पण प्रत्यक्षात? माझ्याच आयुष्यात? का? ती हमसून हमसून रडतेय.
मोकळी व्हायला हवीय ती. गच्चं भरलेलं आभाळ रितं व्हायला हवंय. पण खरंच रितं होईल ते? जिंदगी कैसी ये पहेली हाये… कभी ये रुलाये… कभी ये हँसाये…!! मी तिला कुशीत घेऊन बसलेय. समोर त्या दोघांचा फोटो आहे.
किती सुंदर दिसतेय ती फोटोत! तिच्या डोळ्यांत त्याचं प्रतिबिंब उमटलंय! तो किती खोलवर रुजलाय तिच्या मनात… तिच्या हसण्यातून जाणवतंय ते! आणि तो? तिच्यासमोर असूनही तिचा नाहीच. त्याची नजर दूरवर काहीतरी शोधणारी! कसं जमलं याला हे? इतकं सोपं असतं. मनातून आपलं मानलेल्याला असं हद्दपार करून टाकणं? असं क्षणात विसरून दुसऱ्या कोणाचा तरी हात पकडणं? की न रुजत जगणं? खरंच आपण असेच असतो? या नात्याचं भविष्य काय मग आता? ती हरवलीय… त्याचं काय आता? सापडेल मला ती माझी जुनी सखी? सापडतील तिला तिच्या कविता… तिचे रंग? सापडतील तिला तिच्या पॅलेटवरले ते सुकलेले रंग? उमटतील ते पुन्हा तिच्या कॅनव्हासवर? मला माहीत आहे ती करेलही नाटक हसण्याचं. पण त्या हसण्यात, त्या जगण्यात, ती नसेलच! तिचा आत्मा नसेल! जाने क्या ढुंढती फिरती हैं ये आँखे मुझमे… राख के ढेर में… शोला हैं ना चिंगारी..! उगाचच हे शब्द मला आठवत गेले… तिच्या आसवांनी भरलेल्या डोळ्यांत आता कुठलंच प्रतिबिंब नव्हतं!
अजूनही तिला शोधतेय मी! ती खरंच हरवलीय. तिला शोधायलाच हवंय मला… मी तिची कवितांची वही तिच्यासमोर घेऊन बसलेय. नव्या कवितेच्या प्रतीक्षेत…!