Wednesday, April 30, 2025

पालघर

टेरेसवरून पडून दोन वर्षीय मुलीचा मृत्यू

टेरेसवरून पडून दोन वर्षीय मुलीचा मृत्यू

सफाळे (वार्ताहर) : एका दोन मजली बिल्डिंगच्या टेरेसवर खेळताना तोल जाऊन दोन वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पालघर तालुक्यातील सफाळे पूर्वेकडील मीरानगर भागातील फातिमा अपार्टमेंट येथे घडली.

आकसा आसिफ खान (वय-२) मीरानगर, सफाळे असे मृत मुलीचे नाव आहे. आसिफ शेख हे पेशाने जेसीबी मेकॅनिक असून गेल्या काही वर्षांपासून पत्नी व मुलांसह मीरानगर भागातील फातिमा अपार्टमेंट येथे भाड्याने राहतात. शुक्रवारी आकसा बिल्डिंगमधील अन्य मुलांसह टेरेसवर खेळण्यासाठी गेली होती. दरम्यान, टेरेसच्या कठड्यावरून तिचा तोल जाऊन ती २५ ते ३० फूट खाली पडली. या घटनेनंतर आकसा हिला पार्थ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

डॉक्टरांनी तपासणी केली असता तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. तसेच डोक्याला जबरदस्त मार बसून अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी पुढे नेण्याचा सल्ला दिला. यासंदर्भात, ॲम्ब्युलन्सचालक मिकेश शेट्टी यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ आकसाला नालासोपारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र वेळीच उपचार न मिळाल्याने आकसा हिची प्रकृती अधिक गंभीर होऊन उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Comments
Add Comment