Saturday, April 26, 2025
Homeसाप्ताहिककोलाजपिंगुळीची चित्रकथी

पिंगुळीची चित्रकथी

सतीश पाटणकर

सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे तळकोकणचा एक निसर्गसंपन्न भाग. अनेक कलाकार, खेळाडू, तंत्रज्ञ, पत्रकार, अभिनेते, लेखक, राजकारणी या मातीने देशाला दिलेले आहेत. या मातीचा गुणधर्मच असा काही निराळा आहे की, गावोगावी हमखास कोणी ना कोणीतरी कलाकार सापडतोच. दशावतार ही लोककला जशी इथली खासियत आहे, तशीच आता लोप पावत चाललेली अजून एक कला या प्रांती आहे आणि ती म्हणजे चित्रकथी. चित्रकथी ही महाराष्ट्रातील एक मर्यादित पण महत्त्वपूर्ण लोककला-चित्रपरंपरा आहे. तिचा कथन आणि चित्रण (दृकश्राव्य) असा दुहेरी आविष्कार आढळतो. साधारणतः ३०×४० से.मी.च्या कागदावर ही चित्रे काढलेली असतात. संग्रहालयांतील काही उपलब्ध चित्रे, कागदाचा आकार आणि त्यावरील उत्थित छापाचे ठसे यांवरून ती अठराव्या शतकाचा उत्तरार्ध ते एकोणिसावे शतक या काळातील असावीत. चित्रे रंगवण्यासाठी नैसर्गिक रंग वापरले जात.

पोथीचा काळ, रंगसंगती, चित्रकार आणि त्याची शैली यामध्ये व्यक्तिसापेक्ष फरक पडलेला दिसतो. रामायण व महाभारतातील कथाविषय हे चित्रकथीचे प्रमुख विषय असून लोककथांचे चित्रणही त्यात आढळते. चित्रकथी-परंपरा पैठण व पिंगुळी या दोन नावांनी ठळकपणे ओळखली जाते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे जी चित्रे मिळाली, तिला पैठण चित्रकथी म्हणतात; तथापि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी (ता. कुडाळ) गावात ही चित्रपरंपरा अद्यापही अस्तित्वात आहे. तिला पिंगुळी चित्रकथी म्हणतात. पैठण व पिंगुळी येथील पोथ्यांतील चित्रांच्या शैली एकमेकींशी मिळत्या-जुळत्या नाहीत. या चित्रांचे कथन करणारे कलाकार सचित्र पोथ्या घेऊन गावोगाव हिंडत असत आणि रात्रीच्या वेळी देवळाच्या आवारात चित्रकथीचे कार्यक्रम सादर करीत. नवरात्रीचे नऊ दिवस आणि अन्य महत्त्वाच्या तिथींना असे कार्यक्रम केले जात. याला जागर असेही म्हणतात. एक मुख्य कलाकार व दोन सहकलाकार कार्यक्रमाचे सादरीकरण करीत. मुख्य कलाकार मांडी घालून बसतो व मांडीला टेकवून आयताकार फळी उभी ठेवतो. त्याच्या उजव्या बाजूला चित्रपोथी ठेवलेली असते. पोथीतील एकेक चित्र फळीवर ठेवून तो कथा सांगतो आणि कथनाच्या आवश्यकतेनुसार गाणी म्हणतो. साथीदार टाळ, हुडूक (डमरू), एकतारी आदी वाद्ये वाजवतात. दोन चित्रांचे कागद एकमेकांना पाठपोट चिकटवलेले असतात. त्यामुळे एका चित्राचे निरूपण संपले की, तो कागदाच्या पाठीमागील चित्राचे निरूपण सुरू करतो.

संपूर्ण राज्यामध्ये केवळ सिंधुदुर्गातच या लोककला सादर व्हायच्या. मात्र आता चित्रकथी सादर करणारी राज्यात केवळ दोन कुटुंबे उरली असून, ठाकर समाजाची ही परंपरा जपण्यासाठी या कुटुंबाकडून प्रयत्न होत आहेत. सिंधुदुर्गातील विश्राम गंगावणे आणि गणपत मसगे यांची कुटुंबे चित्रकथी सादर करतात; कुडाळजवळच्या पिंगुळी या गावात दोन कुटुंबे आता ही कला जोपासत आहेत. चित्रकथी ही कला जी काही तग धरून उभी आहे ती केवळ या मसगे व गंगावणे कुटुंबाच्या भरवशावरच टिकून आहे. परशुराम गंगावणे यांनी पिंगुळीला ‘ठाकर आदिवासी कला आंगण’ नावाचे या कलेला वाहिलेले सुंदर प्रदर्शन उभारले आहे.

राजाश्रय असताना बहरलेली ही कला नंतर नंतर क्षीण होत गेली; परंतु गंगावणे यांनी अवहेलना सहन करीत ही कला टिकवून धरली आणि आता त्यांची मुले या कलेची जोपासना करत आहेत.  लोककलेची पन्नास वर्षे जोपासना करणारे पिंगुळी येथील परशुराम विश्राम गंगावणे (वय ६५) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सिंधुदुर्गातील पारंपरिक लोककलेलाच जणू पद्मश्रीचा बहुमान मिळाला आहे.

ठाणे, रायगड जिल्ह्यात सह्याद्रीला धरून जो ठाकर समाज आहे, त्यातलेच हे कुटुंब. यांचे पूर्वज पोटापाण्याकरिता दक्षिणेला सरकत सरकत गेले आणि नंतर कुडाळ येथे स्थायिक झाले. जयराम, बापू महाराज, खेम सावंत या मंडळींचा मोठा आश्रय या कलेला लाभलेला होता. हा ठाकर समाज एकूण ११ कलांमध्ये तरबेज आहे.

११ पारंपरिक आदिवासी लोककलांचा गेली ५० ते ५५ वर्षे वारसा जपणारे राष्ट्रपती पुरस्कार विजेते गणपत सखाराम मसगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ठाकरवाडी आदिवासी म्युझियमला आज १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. दिनांक ९ मार्च २००८ साली मसगे यांनी आपल्या राहत्या घरी या म्युझियमची स्थापना केली होती; परंतु मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात ही म्युझियमची जागा बाधित झाल्यामुळे गणपत मसगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र शिवदास आणि कृष्णा मसगे यांनी या म्युझियमचे नूतनीकरण करत ठाकरवाडी आदिवासी म्युझियमची पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात निर्मिती करत हे म्युझियम आता सिंधुदुर्गवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी खुले झाले आहे.

पैठण आणि पिंगुळी चित्रकथींच्या निर्मितीविषयी तसेच स्थलकालाविषयी विश्वसनीय सबळ पुरावा आढळत नाही. भारतीय लघुचित्रपरंपरा, स्थानिक पद्धती आणि दक्षिण भारतातील चामड्याची लोकचित्रे यांपासून ही  चित्रशैली विकसित झालेली असावी, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. अलीकडील तुरळक चित्रकार वगळता या शैलीतील चित्रकारांची नोंद झालेली नाही; परंतु पिंगुळीतील आदिवासी ठाकर कलावंत परशुराम गंगावणे आणि गणपत मसगे यांनी पिंगुळी शैलीची मौखिक परंपरा जपली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -