Monday, July 22, 2024

पंजा…

डॉ. पल्लवी परुळेकर – बनसोडे

‘काय वर्णू त्या
कलेची नवलाई
तुटक्या पंजानी
त्याने दाविली जादुई’

‘माही वसई कलोत्सव’ म्हणजे आपण या वसईत जन्मलो; या संस्कृतीत वाढलो याचा सार्थ अभिमान बाळगण्याची बाब. जुन्या परंपरा, पद्धती, सर्व जातीधर्मांना एकत्र आणण्याची ताकद वसईकरांकडे आहे, असं म्हणायला हरकत नाही. अगदी वारली, आदिवासी, लोहार ते खानदेशकर, वऱ्हाडी, भंडारी, कुपारी, गुजराथी, ख्रिश्चन, ब्राह्मण या आणि अनेक जातींच्या लोकांना एकत्र आणण्याचं काम ‘माही वसई’ने केलं. त्यांचं राहणीमान, खाण्यापिण्याच्या पद्धती, पेहराव, लग्नसंस्कार, नाच-गाणी या साऱ्यांचं हुबेहूब चित्रण डोळे दिपवणारं होतं. या वसईतला कोळी समाज आणि त्यांच्या व्यवसायाची माहिती देणारा देखावा तर अप्रतिम, पानमाळी लोकांचा पानांचा व्यवसाय, हजारी केळी, देव केळी आणि इतर भाजीपाला, त्याचा व्यवसाय करणारी इथली मंडळी, त्यांचा पेहराव लाजवाब. या वसईने विविध भाषाच नाही तर परंपरा जपल्या, वाढवल्या आणि आपापल्या व्यवसायाची वाढ करून स्वतःची ओळख टिकवून ठेवली. आदिवासी लोक दारू कशी बनवतात त्यांची सामग्री तसेच त्यांनी विणलेल्या चटया, झाडू, टोपल्या, सुपं यातली त्यांची कलाकुसर वाखाणण्यासारखी. भाताची लागवड करणारी मंडळी, बैलजोड्या, मिठागर, पाण्याचे हंडे भरून नेणारी बाई, तुळशीला पाणी घालणारी बाई सारंच विलोभनीय…

पूर्वी टांगागाडी होती. ती इथे पाहिली आणि घोड्याच्या टपटप पावलांनी मनाला पावलं जोडली, बालपण धावत आलं… ती मजाच न्यारी… गाईचा गोठा, ते बोटांनी सारवणं, जात्यावर दळण दळणाऱ्या बायका, उखळीत मसाले कुटणाऱ्या बायका, निवडणं, टिपणं, सारं सारं मस्तच! जुन्या पद्धतीची माडीची घरं, कौलारू छप्पर, पडवीत झुलणारा झोपाळा, दारात कोंबड्यांची खुराडं, झाडाला बांधलेली बकरी, लाकडी उंबरठा, जुन्या कलाकुसरीचा दरवाजा, जुना पाळणा, लाकडी पलंग, माजघरातल्या वस्तू, तळघरात पायऱ्या उतरून स्वयंपाकघर, तांब्या-पितळेची जुनी भांडी, पाटा वरवंटा, उखळ, जातं, शेणाने सारवलेली ओटी आणि तो धूर ओकणारा बंब….

आमच्या लहानपणी गरम पाण्याचा बंब असायचा. आता त्याची जागा गिझरने घेतली खरी पण तेव्हाच्या त्या धुराने आज डोळ्यात पाणी आणलं. चुलीवरचा खमंगपणा. सारं काळापल्याड झालं तरी वसईकरांनी ते सारं जपलं. विहिरीचा रहाट कोसो दूर आठवणीत घेऊन गेला. मागचा भाजीचा मळा मातीचा सुगंध देऊन गेला. रहाटाला जुंपून बैलाची ओढाताण, ते मडक्यांमधल्या पाण्याचं रिंगण, ते भरून ओसरणं, सारंच विलक्षण! जुन्या वाडीत राबणारे आदिवासींचे हात, त्यांच्या एक ठेवणीच्या झोपड्या, शेणाने सारवलेल्या भिंती, ताडाच्या पानांचे छप्पर, ढोलीतली ती कोंबडी, हे सारं आम्ही पाहिलंय…

मातीची धूळ हवेत विरणारे ते खेळ, ती लपाछपी, चप्पीपास, सागरगोटे, सारीपाट, गोट्या, लगोरी, विटीदांडू, लंगडी हे सारं धुळीसारखं विरलं, पण मनातला खेळ चालूच राहिला. या ‘माही वसई’ने दीपवून टाकणारा डाव टाकला. विठ्ठलाची प्रतिकृती, जुनं मंदिर, झाडांची हिरवळाई मनस्वी भावुक करून गेलं सारं… इथे प्रत्येकाने आपापल्या खाण्याच्या पद्धतीचे स्टॉल लावले होते.खानदेशचं थालीपीठ, मोठाल्या पुरणपोळ्या. वांग्याचं भरीत आणि पुऱ्या. केरळी लोकांचे आप्पे आणि आंबोळ्या, डोसे छानच. गुजराथी लोकांचा ढोकळा, उंदियो, कोळी लोकांचे सर्वच पदार्थ अप्रतिम.

खवय्येगिरी करून आम्ही निघालो तरी माझी नजर मागे वळत होती. स्टेजवर अनेक कल्चरल कार्यक्रम, धामधूम, नाचगाणी चालत होती तरी मला त्या पोती भरलेल्या बैलगाड्यांजवळ बसलेला तो आदिवासी, एक लोखंडी सळी आणि त्यावर फिरणारे त्याचे कणखर हात…. एक सूर, एक नाद आळवत होते. त्या लोखंडी सळीवरच्या घर्षणाने त्याचे हात किती पोळत असतील हाच विचार कानावर आदळत होता. लोक पैसे टाकत होते, पण माझ्या मनात त्या नाण्यांचा खणखणाट जखमा करत होता.

ते ओसरत नाही तोच कागदाच्या बोळ्यांनी बनविलेल्या वस्तू विकणाऱ्या बायका अंग सावरून बसल्या होत्या. त्यांच्या नजरा उगाच सलत राहिल्या. मी प्रत्येक वस्तूचे भाव विचारताच एकीने एका पुरुषाकडे बोट दाखविलं. मी किंमत विचारणार तोच त्याचा पंजा नसलेला मनगटाचा हात सामोरा आला आणि माझे शब्द ओठांतच घुटमळले. त्याने मात्र हे हेरलं आणि सफाईने आपलं मनगट पॅन्टीच्या खिशात सरकवलं. जणू काही मी बघितलं ते नव्हतंच, आवात तो इतरांना भाव सांगू लागला. कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या कल्पक वस्तूंना आकार देणारा तो पेल्हारचा आदिवासी पाड्यातून आलेला आदिवासी मनाला पंजा जोडून गेला…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -