
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई कोरोनामुक्त व्हावी यासाठी पालिकेने १६ मार्च २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात केली. त्यानंतर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांच्याही लसीकरणाला सुरवात केली. दरम्यान आतापर्यंत १५ ते १७ वर्षे वयोगटातील लसीकरण केवळ ६० टक्केच मुलांचे झाले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. लहान मुलांच्या म्हणजे १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणालाही कमी प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती दिली आहे.
मुंबई कोरोनामुक्त व्हावी यासाठी पालिकेने लसीकरण मोहीम वेगाने सुरू केली, त्यानंतर समाजातील सगळ्याच वंचित घटकांचे देखील लसीकरण केले. घराघरात जाऊन पालिकेने लसीकरण केले आहे. यामुळेच मुंबईत १८ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे. त्यानंतर पुन्हा पालिकेने बूस्टर डोस, फ्रंटलाईन वर्कर यांच्या लसीकरणावर भर दिला.
दरम्यान केंद्राने सूचना दिल्यानंतर पालिकेने लहान मुले आणि १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले. मात्र त्या लसीकरणाला पुरेसा प्रतिसाद मिळत नसून १५ ते १७ वर्षे वयोगतील केवळ ६० टक्के मुलांचे लसीकरण झाले आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला आहे.
दरम्यान शाळांना सुट्टी किंवा परीक्षा यामुळे लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. दरम्यान लहान मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी पालिका विविध लोकवस्त्यांमध्ये जाऊन शिबिरांद्वारे लसीकरण करणार आहे.
मुंबईत १९८ नवे रुग्ण
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत असला तरी गेल्या दोन-तीन दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी मुंबईत १९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी २१३ आणि गुरुवारी २२३ एवढी दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या होती. दरम्यान शनिवारी बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या १३९ आहे तर मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या १२११ एवढी झाली आहे. विशेष म्हणजे मुंबईत रुग्ण दुप्पटीचे दिवस कमी होत असून ४४३३ दिवस झाले आहेत.