
अर्चना सोंडे
भारताने जगाला शून्याची देणगी दिली. त्यामुळेच जगात अंकशास्त्र जन्माला आले. या अंकशास्त्राने जगाला भुरळ घातली. या अंकशास्त्राचा तिने बारकाईने अभ्यास केला. या शास्त्राद्वारे आपण इतरांना लाभ मिळवून देऊ शकतो हे तिच्या ध्यानी आले. तिने मग अंकशास्त्राद्वारे इतरांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. निव्वळ मुंबई-ठाणेच नव्हे, तर अगदी दुबईमधल्या क्लायंट्सना पण ती सेवा देऊ लागली. एकंदर आयुष्याचा फॉर्म्युला ती बनवू लागली. ही कथा आहे आयुष्याचा फॉर्म्युला शिकवणाऱ्या न्युमरोलॉजिस्ट नीरू पाटील यांची.
नीरू पाटील यांचा जन्म परेलच्या वाडिया इस्पितळात झाला. बालपण नायगाव येथील चाळीत गेले. त्यांचा जन्म संयुक्त कुटुंबात झाला. मसाल्याचा व्यापार हा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय होता. त्यांना एकूण पाच भावंडे. बाबा बळीराम मारुती भोसले हे मसाल्याचा कौटुंबिक व्यवसाय सांभाळत होते, तर आई पार्वती या गृहिणी होत्या. नीरूचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. मात्र तिला विविध विषय शिकण्यात स्वारस्य होते. नावीन्याचा शोध घेणे तिची आवड होती. म्हणूनच भरतकामसारख्या जवळपास प्रत्येक विषयात ती तरबेज झाली.
प्रत्येकाची एक जन्मतारीख आहे. जर बारकाईने अभ्यास केला, तर आपल्याला दिसून येते की, या जन्मतारखेच्या अंकाची बेरीज केली तर एक अंक मिळतो. हा अंक आपल्या आकाशगंगेतील एका ग्रहाशी निगडित असतो. हे ग्रह कित्येक प्रकाशमैल दूर अंतरावर आहेत. मात्र या ग्रहांचा आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. हा परिणाम सकारात्मक व नकारात्मक असू शकतो. नीरू यांनी या साऱ्या शास्त्राचा बारकाईने अभ्यास करून स्वत:चे वेगळे फॉर्म्युले विकसित केले. या फॉर्म्युल्याचा उपयोग त्यांनी विविध व्यक्तींसाठी केला. त्यातून सकारात्मक परिणाम दिसून आले. खरंतर आपलं शरीर हे नऊ ग्रहांपासून बनलेले आहे. त्या ग्रहांचा आपल्यावर खूप प्रभाव असतो. ते जर सकारात्मक हाताळले तर आयुष्यात चांगले बदल घडू शकतात, असा दावा नीरू करतात.
खरं तर नीरू या वास्तुशास्त्र शिकल्या होत्या. त्यानंतर अंकशास्त्रासोबत त्यांची ओळख झाली. अंकामुळे व्यक्तीच्या जीवनात प्रभाव पडू शकतो हेच त्यांच्यासाठी अप्रूप होतं. अंकशास्त्राने त्यांना प्रभावित केलं. विशेषत: विविध ग्रह आपल्या जीवनावर कसा प्रभाव पाडू शकतात, हे त्यांच्यासाठी आश्चर्य होते. यातून त्यांनी संशोधन सुरू केले. आपल्या सभोवतलाच्या वर्तुळातील विविध जन्मतारखांचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांनी स्वत: काही ठोकताळे निर्माण केले. हे ठोकताळे लोकांना पटायला लागले. त्यातून त्यांनी अंकशास्त्र ज्ञानाचे धडे देण्यास सुरुवात केली. हे धडे देण्यापूर्वी मात्र त्या संबंधित व्यक्तीचा संपूर्ण अभ्यास करतात.
एखाद्या व्यक्तीने विनंती केली वा मानधन देऊ केले म्हणून त्या अंकशास्त्राची सेवा देत नाही. अंकशास्त्रामध्ये सदर व्यक्तीला विश्वास असणे आवश्यक असते. सोबतच नीरू त्या व्यक्तीस काही उपचार पद्धती सांगतात ज्या क्लिष्ट नसतात. या उपचार पद्धतीचा वापर करून संबंधित व्यक्ती स्वत:च्या समस्येवर मात करू शकते. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे वाक्य प्रत्येकास अचूक लागू होते, असं त्या सांगतात. “मी सदर व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा सखोल अभ्यास करते. अंकशास्त्रासोबत त्याची सांगड घालते. मी तयार केलेले काही फॉर्म्युला सदर व्यक्तीस कसे लागू पडतील हे पाहते. या सगळ्यांशी सुसंगत एक उपचार पद्धत असते, जी सदर व्यक्तीच्या समस्येवर रामबाण उपाय असते, त्या उपचार पद्धतीवर संपूर्ण विश्वास ठेवून जर सदर व्यक्तीने अमल केला, तर निश्चितच तिच्या समस्या दूर होतात, असे नीरू सांगतात. अशा अनेकांच्या समस्या नीरू यांनी दूर केलेल्या आहेत.
इथे विशेष नमूद करणारी एक बाब म्हणजे नीरू आपल्या व्यवसायासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्या आपल्या सेवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देतात. काही हजार व्यक्तींना त्यांनी विविध समस्येतून मुक्त केले आहे. त्या सगळ्या व्यक्तींसोबत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनच त्यांनी सल्लामसलत केली आहे. विशेष म्हणजे त्या सगळ्या व्यक्ती नीरू यांच्या समुपदेशामुळे समाधानी आयुष्य जगत आहेत, असे नीरू म्हणतात. “आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती विविध समस्येसोबत झुंजत आहे. विशेषत: तरुणाईसमोर अनेक आव्हाने आहेत. ही पिढी कमालीची हुशार आहे, पण तितक्याच लवकर यश पदरी न पडल्यास निराश होणारी देखील आहे. अशा तरुणाईसाठी मी विशेष काम करते. अनेक तरुण मुला-मुलींना त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यास मदत करते.”
आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, मात्र आपले कार्य तळागाळापर्यंत पोहोचावे यासाठी त्या प्रशिक्षण देतात. एक ते दीड महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी असतो. अनेकजण हे प्रशिक्षण करण्यास उत्सुक असतात. मात्र हे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला सहजासहजी प्रवेश मिळत नाही. त्यासाठी काही चाचण्या द्याव्या लागतात. नीरू पाटील यांच्या अंकशास्त्र अभ्यासामुळे त्यांना नीरू न्युमरोलॉजिस्ट देखील संबोधले जाते.
अंकशास्त्र वा न्युमरोलॉजी हे शास्त्र आहे. येथे अंधश्रद्धेस थारा नाही. काही तत्त्व आणि समीकरणावर आधारित हे अंकशास्त्र विकसित झालेले आहे. नीरू न्युमरोलॉजिस्ट त्याचा समाजासाठी सकारात्मक वापर करत आहेत. अनेक उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थ्यांनी या शास्त्राचा वापर केला आहे. नीरू न्युमरोलॉजिस्ट या एकमेव कर्त्या आहेत, पण त्यांना मदत करणारे अनेक हात आहेत म्हणून हे शक्य झाले, असे नीरू प्रांजळपणे कबूल करतात.
आयुष्य जगण्याचा फॉर्म्युला शिकवणाऱ्या नीरू न्युमरोलॉजिस्टसारख्या लेडी बॉसची प्रत्येक क्षेत्रात आज गरज आहे.