Tuesday, December 10, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेमहापालिकेला आली जाग...

महापालिकेला आली जाग…

येऊरमधील अनधिकृत धाबे आणि बंगले यांच्यावर होणार कारवाई

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहरात अनधिकृतपणे चालणाऱ्या डान्सबार बरोबरच आता येऊरमधील अनधिकृत धाबे आणि बंगले पालिकेच्या रडारवर आले आहेत. येऊरमध्ये आजच्या तारखेला मोठ्या प्रमाणात अनधिकृत धाबे सुरू असून काही ठिकाणी नवीन बंगल्यांची कामे देखील सुरू असल्याचे उघड झाले आहे.

यापूर्वी ज्या ढाब्यांवर आणि हॉटेलवर कारवाई करण्यात आली होती. त्यांनी पुन्हा बांधकामे केली आहेत याची चाचपणी देखील पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. तर सध्याच्या घडीला नेमकी किती अनधिकृत बांधकामे आहेत याचा सर्व्हे देखील सोमवारपासून करण्यात येणार असून त्यानंतर पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या निर्देशानंतर पुढारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिली.

सन २०१७ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरला पर्यावरणीय संवेदनाशील क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. वनक्षेत्रात होणारी अतिक्रमणे व त्यांपासून निर्माण होणाऱ्या वन्यजीव मानव संघर्षावर काबू मिळविण्याच्या हेतूने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने वटहुकूम काढून येऊर बफर झोन मध्ये १०० मीटर पर्यंत बांधकाम बंदी लागू केलेली आहे. असे असताना बिनदिक्कत वन विभाग, ठाणे महानगरपालिका, जिल्हा प्रशासन या सर्वांना ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत धाबे सुरू आहेत. गेल्या ३ वर्षात येऊरमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. यातील बहुतांश बांधकामे ठाणे आणि मुंबईतील प्रतिष्ठितांची असून यात राजकीय नेते, कार्यकर्ते, निवृत्त अधिकारी, आजी माजी नगरसेवकांची आहे.

याविरुद्ध पर्यावरणीय स्वयंसेवी संस्था तसेच येऊर येथील नागरिकांनी गेल्या काही वर्षात अनेकदा तक्रारी देऊनही प्रशासनाच्या आशीर्वादाने बिनदिक्कत दिवसाढवळ्या नवनवीन बांधकामे येऊरमध्ये सुरू आहेत. ही बांधकामे निष्कासित करण्याची प्राथमिक जबाबदारी ठाणे महानगरपालिकेची असताना कामात कुचराई करत असल्याच्या आरोप पर्यावरण संस्थांनी यापूर्वी केला आहे.

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने पुन्हा येऊरमधील बांधकामांचा सर्व्हे केला जाणार असून सर्व्हेमध्ये जी अनधिकृत बांधकामे अढळली, त्यावर पालिका आयुक्तांच्या निर्देशानंतर कारवाई केली जाणार आहे. सोमवारपासून हे सर्व्हेक्षण सुरू करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी स्पष्ट केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -