Tuesday, December 10, 2024
Homeक्रीडामुंबईचा विजय बंगळूरुच्या पथ्यावर!

मुंबईचा विजय बंगळूरुच्या पथ्यावर!

पराभवामुळे दिल्लीचे आव्हान संपुष्टात

मुंबई (प्रतिनिधी) : जसप्रीत बुमराची अप्रतिम गोलंदाजी आणि इंडियन्सची सांघिक फलंदाजी शनिवारी मुंबईचा यंदाच्या हंगामातील शेवट गोड करून गेली. मुंबईचा हा विजय अधिक आनंद देऊन गेला तो या सामन्यावर लक्ष ठेवून असलेल्या बंगळूरुला. मुंबईच्या विजयाने बंगळूरुने बाद फेरीत प्रवेश केला, तर पराभवासह दिल्लीचे ‘प्ले-ऑफ’ प्रवेशाचे स्वप्न भंगले.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या मुंबईने फलंदाजीत अक्षरश: जीव ओतला. कर्णधार रोहित शर्माला धावा जमवता आल्या नसल्या तरी आतापर्यंत थंड असलेली इशन किशनने बॅट दिल्लीविरुद्ध तळपली. त्याने डेवाल्ड ब्रेवीसच्या साथीने मुंबईला विजयी मार्गावर आणले. कुलदीप यादवने वॉर्नरकरवी झेलबाद करत किशनच्या रुपाने दिल्लीला मोठे यश मिळवून दिले. किशनने ३५ चेंडूंत ४८ धावा जमवल्या. त्यानंतर सेट झालेला ब्रेवीसही फार काळ थांबला नाही.

त्याने उपयुक्त अशा ३७ धावा ठोकल्या. टीम डेविडने फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. त्याने २ चौकार आणि ४ षटकार लगावत केवळ ११ चेंडूंत ३४ धावांची तुफानी खेळी खेळली. त्यामुळे विजय मुंबईच्या आवाक्यात आला. त्याला तिलक वर्मानेही जबाबदारीने साथ दिली. विजयासाठी ६ धावांची आवश्यकता असताना तिलक वर्माने विकेट गमावली. पण रमणदीप सिंग आणि डॅनियल सॅम्सने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईने ५ फलंदाजांच्या बदल्यात २० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विजयी लक्ष्य गाठले. नॉर्टजे आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.

जसप्रीत बुमरा आणि डॅनियल सॅम्स या गोलंदाजांच्या जोडगोळीच्या आक्रमणापुढे दिल्लीच्या आघाडीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. वॉर्नर, मार्श या परदेशी फलंदाजांना बुमरा, सॅम्सने मान वर काढू दिली नाही. वॉर्नरचा अडथला सॅम्सने दूर केला, तर बुमराने मार्शला माघारी धाडले. संघाची धावसंख्या २२ असताना हे दोन्ही फलंदाज पॅवेलियनमध्ये परतले होते. त्यापाठोपाठ सलामीवीर पृथ्वी शॉचाही संयम सुटला. त्याने २३ चेंडूंत २४ धावांची संयमी खेळी खेळली. त्यानंतर सर्फराज खानही फार काळ थांबला नाही.

संकटात सापडलेल्या दिल्लीसाठी कर्णधार पंत आणि रोवमन पॉवेल धाऊन आले. या जोडीने ७५ धावांची भागीदारी करत दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्यात पंतच्या ३९ आणि पॉवेलच्या ४३ धावांचे योगदान आहे. तळात अक्षर पटेलने २ षटकार ठोकत संघाच्या धावांची गती वाढवली. त्याने १० चेंडूंत नाबाद १९ धावा केल्या. दिल्लीला २० षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात १५९ धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईच्या बुमराने चमकदार कामगिरी केली. त्याने ४ षटकांत अवघ्या २५ धावा देत ३ बळी मिळवले. त्याला मार्कंडे, सॅम्स यांनी चांगली साथ दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -