माधवी घारपुरे
नुकतीच काही महत्वाच्या कामासाठी सीएसटीला जायला निघाले. घाईघाईत लोकल प्लॅटफॉर्मला येत असतानाच पकडली. चढले पण बसायला जागा नाही. एकाच ठिकाणी चौथी सीट दिसली म्हणून त्या बाईला म्हटले, ‘प्लीज जरा सरकता का?’
मोठ्या फणकाऱ्याने म्हणाली, ‘सरकायला जागाच कुठाय? बघा तिघीही जाड आहेत. सरका काय सरका?’
मी गप्प बसले. घाटकोपरला अजून एक लोंढा आत आला. त्यातली एक त्या बाईची कुणीतरी होती. ती दिसल्याबरोबर ही ओरडली, ‘ए रश्मी, अय्या! किती दिवसांनी भेटलीस गं’ मावशी कशी आहे? ये ये, ए, प्लीज थोड्डं सरका. बसू. अर्धा तास.‘अर्धा तास?’, ‘जरा अडचण झाली तर बिघडलं कुठे?’ त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.
२०-२५ मिनिटांपूर्वी आपण कुणाला नकार दिला होता हे पण ती बाई विसरली, पण मला मात्र विचाराला चालना देऊन गेली. आपलं आणि दुसऱ्याचं.
आपलं म्हटलं की, सगळं सुगम असतं. पण दुसऱ्याचं म्हटलं की दुरापास्त असतं. आपल्याच घरात आपल्या मुलांनी कितीही पसारा केला तरी आवरण्यात आनंद असतो, पण दुसऱ्याच्या मुलानं केलेली घाण म्हणा, कचरा म्हणा, आवरायचे खूप श्रम होतात. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही म्हण किती पिढ्या जुनी असेल पण तंतोतंत खरी आहे. चौथ्या सीटवर मला बसायला जागा द्यायला मी दुसरी होते. पण, रश्मी मात्र आपली होती.
खरं आहे, आपल्याला आपल्या मौजेचं ओझं कधी होत नाही, कारण मौज आपण करणार असतो, त्यासाठी जे कष्ट पडणार असतील ते स्वीकारलेले असतात. कुणी आपल्यावर लादलेले नसतात. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची एक गोष्ट आठवते. ही त्यांची आवडती लोककथा.
टेकडीवर एक गृहस्थ फिरायला जातो. खाली उतरताना समोर टेकडी चढत येणारा एक मुलगा त्या गृहस्थाला दिसतो. पण, त्यांच्या पाठीवर त्याच्यापेक्षा लहान असलेला एक मुलगा असतो. साहजिकच चढताना त्याला कष्ट होताना जाणवतात. मोठ्या प्रेमाने ते गृहस्थ विचारतात.
‘बघ, हे ओझं कुठाय? अहो आजोबा हा तर माझा भाऊ आहे भाऊ!’
किती खरं आहे ना? भाऊ असला तर त्याचं ओझं कसं होईल? आणि ओझे असेल भाऊ कसा?
गोष्ट किती छोटी! पण किती अर्थपूर्ण!
आपलं असेल ते आपलं आहेच पण दुसऱ्याचं असेल तेही आपलंच मानलं तर सध्याच्या स्थितीतला समाज किती बदललेला दिसेल? सर्व मोठ्या लोकांनी दुसरं काय केलं? दुसऱ्याला आपलं मानूनच कार्य केलं म्हणून आपण त्यांना आपलंस केलं हे खरं पण या लोकांची कार्य मात्र आपलीशी केली नाहीत. ती मात्र मी सोडून इतरांची हीच भावना अजूनही अस्तित्वात आहे. पण जे ‘माझं’ या भावनेपलीकडे गेले त्यांनी किती दीपस्तंभ उभारले? ओडिशामधला मांझी याने १५ किमीचा रस्ता तयार केला. मुलांच्या शिक्षणाचे वेड त्याच्या डोक्यात. शाळेत जायला रस्ता नाही. तो केला तर सगळीच मुलं शाळेत सुखाने जातील आणि सोन्यासारखं शिक्षण मिळेल.
अहमदनगरच्या स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी १८व्या वर्षापासून गेली ३० वर्षे वेश्या व्यवसायातली वंचित मुलं आणि महिलांसाठी कार्यरत आहेत. या पुनर्वसन संकुलात ४०० मुलांचं आयुष्य बदललंय. ‘माझं सोडूनच ते ‘आपल’ काम करताहेत. ६५ जावई, १०० सुना असलेल्या सिंधुताई सकपाळांनी काय केलं? हेटाळणी स्वीकारली आणि मुलांसाठी आनंदाचा सडा घातला. मी आणि माझं धरून वर्तुळ आखलं तर परिघ कधीच विस्तारणार नाही.
‘खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख, कुपातील मी नच मंडूक… मळ्यास माझ्या कुंपण पडणे, अगदी न मला साहे…’ म्हणणाऱ्या केशवसुतांना,
‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे… घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे…’ म्हणणाऱ्या विंदांना िकंवा ‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे…’ म्हणणाऱ्यांना ‘माझं आणि आपलं’ हेच सुचवायचं होतं ना?