रवींद्र तांबे
प्रत्येकाला आपले आयुष्य घडविण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असते. तेव्हा आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक अभ्यासक्रमाचा शोध घ्यावा लागेल. काही पालकवर्ग स्वत: शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन मुलांच्या अभ्यासक्रमांची निवड करतात. त्यात काही मुले समाधानी तर काही इच्छा नसतानासुद्धा आई-वडिलांच्या इच्छेसाठी अभ्यासक्रमाची निवड करावी लागते. त्यामुळे मुले नाराज झालेली दिसतात. सध्या शैक्षणिक संस्थांना उन्हाळी सुट्टी चालू आहे. तेव्हा आपण दिलेल्या परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी आपल्या आवडीच्या विद्याशाखेचा विचार करता प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या भविष्यकाळाचा विचार करून शैक्षणिक अभ्यासक्रमाचा शोध घेतला पाहिजे. मागील दोन वर्षे कोरोना व्हायरसच्या विषाणूशी कसा संघर्ष केलेला आहे त्याचा पूर्ण अनुभव सर्वांना आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्यामध्ये उन्हाचे चटके सहन करीत असताना भविष्यकाळाचा विचार करून मुलांनी शिक्षणाचे धेय्य ठेवले पाहिजे.
आता जरी काही ऑफ लाइन परीक्षा झाल्या अथवा होत असल्या तरी कोरोनाचे सावट अजून पूर्णतः संपलेले नाही. तेव्हा आजच्या विद्यार्थ्यांनी कोरोना महामारीचा अनुभव लक्षात घेऊन आपला कल कोणत्या विद्या शाखेकडे आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा एखादा व्यवसाय करणे यासाठी स्वत:हून आपले लक्ष केंद्रित करावे. यातच विद्यार्थ्यांचे हित अवलंबून असून आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तम प्रकारे करिअर करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी आपला निर्णय स्वत:हून घ्यायचा आहे. कोणत्याही जाहीरातीला भुलून अभ्यासक्रमाची निवड न करता त्याची शहानिशा करावी. नंतर पश्चाताप करून घेण्यापेक्षा आजच डोके शांत ठेऊन आपल्या आयुष्याच्या आवडीच्या क्षेत्रात उतुंग भरारी घेण्यासाठी योग्य निर्णय घेण्याची हीच वेळ आहे. तेव्हा इतरांचे ऐकून घेऊन आपल्या भविष्य काळाचा विचार करून मनावर कोणतेही दडपण न घेता योग्य शिक्षणाची दिशा विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी ठरवावी.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत राज्यात नऊ विभागात मार्च/एप्रिल २०२२ मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. त्याचा निकाल जून महिन्यामध्ये लागेल. तेव्हा निकाल लागल्यानंतर कोणत्या शाखेची निवड करावी. मित्र कोणता अभ्यासक्रम निवडणार आहे, अशा संभ्रमात मुले पडतात. तेव्हा असा संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून सुट्टीच्या काळात उद्याचा विचार करून अभ्यासक्रम निवडावा.
त्या आधी आपल्याला कोण व्हावेसे वाटते, कोणती पदवी घेणार जेणेकरून आपले करिअर उत्तम प्रकारे घडून आपण जीवनाचा यशस्वी प्रवास करू शकू. यासाठी स्वत:च्या मनाची तयारी करून योग्य शाखेची निवड करायला हवी. म्हणजे अभ्यासक्रम निश्चित करावा लागेल.
केवळ आपला मित्र कोणत्या शाखेतून शिक्षण घेतो याची वाट न बघता आपल्या आवडीच्या क्षेत्रात गरुड झेप घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:हून निर्णय घेणे गरजेचे आहे.सध्या कोणतीही पदवी घेतली तरी त्या विद्यार्थ्यासमोर नोकरीचे आव्हान आहे. चांगल्या पगाराची नोकरी लगेच भेटेल याची शाश्वती नाही. असे असले तरी स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्वत:चा निर्णय स्वत: घ्यावा लागेल.
आतापर्यंत दहावी/बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे आई-वडील आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी कोणकोणत्या पदव्या घेता येतात. आपल्या परिसरात असणाऱ्या महाविद्यालयांना भेट देऊन महाविद्यालयात कोणकोणते अभ्यासक्रम शिकविले जातात याची चाचपणी करायचे. त्यानंतर घरी जावून आपल्या मुलांबरोबर चर्चा करायचे आणि त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचे. आता जरी पदवी घेऊन नोकरीची हमी नसली तरी मुलांच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून योग्य पदवीच्या अभ्यासक्रमाची निवड करावी लागेल. त्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाकडेसुद्धा दुर्लक्ष करू नये. एखादा व्यावसायिक अभासक्रम निवडून स्वत:च्या पायावर उभे कसे राहता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला हवेत. ही आजची परिस्थिती आहे. तसेच स्पर्धात्मक परीक्षेसाठी सुद्धा पुढे आले पाहिजेत.
निकालाच्या तारखा जरी जाहीर झाल्या नसल्या तरी जून महिन्यामध्ये दहावी/बारावीचे निकाल लागतील. दहावी आणि बारीवीनंतर पुढे कोणकोणते अभ्यासक्रम आहेत याचे सर्व्हेक्षण विद्यार्थ्यांना करावे लागेल. दहावीनंतर कला, वाणिज्य, विज्ञान त्याचबरोबर विविध डिप्लोमा आहेत. त्याचा शोध घावा लागेल. अतिशय महत्त्वाचे म्हणजे, बारावीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबर आपल्या आवडीच्या विषयाची निवड करावी. मित्राने एखादा विषय घेतला म्हणून स्वत: घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नये. एकदा अभ्यासक्रम निवडल्यानंतर आपले कोणत्या विषयामध्ये चांगले करिअर होईल याचा विचार करून विषयाची निवड करावी. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वत:हून शैक्षणिक अभ्यासक्रमाचा शोध घ्यावा लागेल.