
भारतीय कलेचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत म्हणून सुनीला दातार यांनी प्राचीन कला जपण्याचा जणू ध्यासच बाळगला आहे. त्यांच्या या भावविश्वात नवी पिढीदेखील सामावली आहे.
प्रियानी पाटील
जच्या जगात पाश्चिमात्य संस्कृतीचा ध्यास नव्या पिढीने घेतला असताना यामध्ये आपली भारतीय संस्कृती जतन करणे आणि ती आत्मसात करणे खरंच खूप अवघड आहे. त्यातही नव्या पिढीने हा ध्यास घेणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. विशेषत: नृत्याचे धडे गिरवताना आपण पाश्चिमात्य संस्कृतीकडे न वळता शास्त्रीय नृत्याकडे वळल्यास भारतीय प्राचीन सस्कृतीचा वसा आपल्याकडूनही निश्चितच जपला जाईल आणि नव्या पिढीलाही याचे धडे देता येतील, या उद्देशाने नृत्य क्षेत्राकडे वळलेल्या डोंबिवलीच्या प्रसिद्ध कथ्थक नृत्य विशारद अॅड. सुनीला दातार-पोतदार या अखंडपणे नृत्यातून आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा वसा जपण्यात आज यशस्वी झाल्या आहेत.
सुनीला दातार यांचं हे नृत्याचं भावविश्व हे केवळ स्वत:पुरतं मर्यादित नाही, तर या भावी विश्वात नवी पिढीदेखील सामावलेली आहे. नव्या पिढीलादेखील शास्त्रीय नृत्याच्या कलाविष्कारातून त्यांनी धडे देताना कलेचा वारसा पुढे न्यायचे ठरवले आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचा ताल सावरताना त्यांनी भारतीय प्राचीन संस्कृतीचा तळ गाठण्याचा हा प्रयत्न केला आहे. डोंबिवलीमध्ये सुनीला दातार यांनी एकलव्य फाऊंडेशन या संस्थेमार्फत अनेक शास्त्रीय नृत्याचे विद्यार्थी घडवले आहेत. त्यांची संस्था ही केवळ संस्था नव्हे, तर कलाकारांना स्फुरण देणारं एक जिवंत माध्यम आहे. जिथे सर्वांगीण विकासाबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपली जाते. आजवर ५०० हून अधिक विद्यार्थिनींना कथ्थक प्रशिक्षण देत ७०० हून अधिक नृत्य सोहळ्यामध्ये सहभाग, २००च्या वर नृत्यामध्ये संस्थेचा सहभाग तसेच १५० हून अधिक ऑनलाइन प्रोजेक्ट्स असा पल्ला त्यांनी गाठला आहे.
सुनीला दातार या गुरुवर्या नृत्यालंकार संगीताचार्य वैशाली दुधे यांच्या विद्यार्थिनी असून महाकवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ येथून कथ्थकमध्येच त्यांनी एमए केले आहे. आजवरच्या नृत्यप्रवासात त्यांच्या संस्थेला संगीतकार श्रीधर फडके, महेश काळे, प्रकाश बाबा आमटे, रमेश देव, सीमा देव यांसारख्या व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे.
तर दुबईत रौप्य, कांस्यपदक, आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट नृत्य शिक्षक पुरस्कार, राज्यस्तरीय कलारत्न गौरव पुरस्कार, आदी अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. त्यांची संस्था ही केवळ संस्था नव्हे, तर एक संस्कार आहे. कारण अनेक विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे हे एक कलेचे माध्यम आहे. त्यांचा हेमलकसा येथील नृत्याविष्कार सादर झाला आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी दिलेली कौतुकाची थाप अविस्मरणीय अशीच मानावी लागेल.
त्यांच्या संस्थेने आजवर केवळ संस्था म्हणून काम केले नाही, तर कोरोनाच्या कठीण काळातही त्यांनी संस्थेची घोडदौड यशस्वीपणे सुरू ठेवली होती. नृत्यकलेला शास्त्राची जोड देऊन अनेक विद्यार्थ्यांना ते पटवून देण्यात त्या यशस्वी ठरल्या.
डोंबिवलीतील अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यात सुनीला दातार यांच्या संस्थेचा सहभाग असतोच असतो. त्यांच्या कार्यात त्यांना आजवर कुटुंबाची मोलाची साथ लाभल्याचा उल्लेख त्या आवर्जून करतात. नृत्याच्या संस्कारात त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. याचं श्रेय त्या सगळ्यांना देतात. त्यांच्या नृत्य प्रवासामध्ये अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे. अनेकांनी त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. याचं श्रेय त्या दीपाली काळे यांना द्यायला विसरत नाहीत. आजची आधुनिक पिढी ही अधिक संस्कारक्षम बनविण्यासाठी, भारतीय कलेचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत म्हणून त्यांनी आपली प्राचीन कला जपण्याचा जणू ध्यासच बाळगला आहे. या प्राचीन संस्कृतीला आधुनिक नव्या पिढीला घट्ट जोडून ठेवण्यात सुनीला या यशस्वी झाल्या आहेत. त्यांच्या नृत्य कलेचा वारसा नव्या पिढीला लाभण्यासाठी अनेक नृत्याविष्कारातून आज विद्यार्थी पुढे सरसावल्याचे दिसत आहे. नृत्य हाच त्यांचा ध्यास आणि श्वास असल्याने त्यांची संस्कृती जपण्याची ही कला अखंड अविरत झऱ्याप्रमाणे नव्या पिढीच्या नसानसात खळाळते आहे. आपली कला जिवंत ठेवण्यासाठीचे सुनीला दातार यांचे प्रयत्न हे यशस्वितेचा पल्ला गाठणारे ठरत आहेत, हे नक्की!